साक्री शहरातील राजे मंगल कार्यालयात खानदेश संस्कृती फेस्टिवल या सांस्कृतिक मेळाव्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपच्या जिल्हाध्यक्षा धरती देवरे उपस्थित होत्या. त्यांनी मेळाव्यातील महिलांच्या विविध स्टॉलना भेटी दिल्या आणि उद्योजक महिलांना प्रोत्साहन दिले. उद्घाटन सोहळ्याला भाजपचे नेते तथा माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ॲड. पूनम शिंदे-काकुस्ते आणि गटविकास अधिकारी मोनाली करांडे आदी उपस्थित होते.
महिला उद्योजकांसाठी व्यासपीठ
या फेस्टिवलच्या निमित्ताने खाद्यपदार्थ, कपडे, गृह सजावटीचे सामान आणि खाण्याचे स्टॉल महिला उद्योजक व बचतगटांच्या माध्यमातून वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी झाली. महिला उद्योजकांनी आपल्या उद्योगांना भरारी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन देवरे यांनी केले. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी शासकीय योजनांची माहिती घेणे आणि त्यांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वप्ने ताकतीने साकारावीत
स्वप्ने लहान असू शकतात, परंतु ती ताकतीने आणि मेहनतीने साकारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळू शकते, असे मत ॲड. काकुस्ते यांनी व्यक्त केले. या फेस्टिवलचे आयोजन खुशी चौधरी, शालिनी भामरे आणि मयुरी बोरसे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी यांचे विशेष सहकार्य महिलांना लाभले आहे. स्थानिक महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या मेळाव्यामागील उद्देश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply