राज्यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी आणि मुलींबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून लेक लाडकी योजना राबवली जात आहे. या योजनेखाली पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण १,०१,००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
टप्पेनिहाय लाभ कसा मिळतो?
१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र ठरतात. मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर ६,००० रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यावर ७,००० रुपये आणि अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८,००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५,००० रुपये मिळतात. अशा प्रकारे एकूण १,०१,००० रुपयांचा लाभ कुटुंबाला मिळतो.
अर्जप्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून, अर्ज नोंदणीपासून ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यापूर्वी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावा लागत असे. त्यानंतर ते अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्र करून तत्कालीन पोर्टलवर नोंदवले जात असत.
पात्रतेसाठी अटी कोणत्या?
योजनेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न व इतर पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पहिला लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या २,९८,६९५ इतकी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply