नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच एक आधुनिक सहकार संकुल उभे राहणार आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या जागेवर हे संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला वेग दिला जाणार आहे.
सारडा संकुल परिसरात असलेली सध्याची इमारत सुमारे ६० वर्षे जुनी असून ती जीर्ण झाली आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी ६६ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच भूमिपूजन होऊन काम सुरू होणार आहे.
सहा कार्यालये एकाच छताखाली
सध्या सहकार विभागाची सहा प्रमुख कार्यालये शहरात वेगवेगळ्या भाड्याच्या इमारतींमध्ये विखुरलेली आहेत. नवीन संकुलामुळे ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे शासनाचा भाड्यापोटी दरमहा होणारा एक लाख ८० हजार रुपयांहून अधिक खर्च वाचणार आहे. शेतकरी, सहकारी संस्था, पतसंस्थांचे सभासद आणि सामान्य नागरिकांची कामे अधिक जलद आणि सुलभ होणार आहेत.
संकुलात कोणत्या सुविधा असणार
प्रस्तावित सहकार संकुल दहा मजली असणार असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ८०८०.९० चौरस मीटर असेल. इमारतीत पाच वेगवान उद्वाहक, प्रशस्त वाहनतळ, बैठक सभागृह, निवडणूक कक्ष आणि अभ्यागत प्रतीक्षा कक्ष असणार आहेत. महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच हिरकणी कक्षाची सोय असेल. छतावरील सौर यंत्रणा, पर्जन्य जलसंचय आणि आधुनिक जैविक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा तसेच सर्वसमावेशक अग्निशमन सुरक्षा यंत्रणाही संकुलात असणार आहे. सहकार विभागाची सर्व कार्यालये एकत्रित आल्याने सहकारासंबंधीच्या कामांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल, असे आमदार फरांदे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply