धाराशिव शहरातील रहिवासी भागांमधील पालिकेच्या मालकीच्या अनेक खुल्या जागा सध्या पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करताना नियमानुसार ठराविक जागा खुल्या वापरासाठी आरक्षित ठेवावी लागते. मात्र पालिकेच्या अनास्थेमुळे यापैकी बहुतांश ठिकाणच्या जागांचा वापर नागरिक केवळ कचरा टाकण्यासाठीच करत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या मालकीच्या जागाही दुर्लक्षित असल्याने तिथे अतिक्रमणांना निमंत्रण मिळत आहे.
देखभालीअभावी उद्याने ओसाड
खुल्या जागांचा योग्य वापर केला तर शहराच्या सौंदर्यात भर पडते. काही वर्षांपूर्वी पालिकेने पुढाकार घेऊन अशा काही जागांवर लहान उद्याने विकसित केली होती. सुरुवातीला स्थानिक नागरिकांना त्यांचा मोठा फायदा झाला. परंतु पुढे नियमित देखभालीअभावी तिथे दुरवस्था झाली आणि हळूहळू या जागा पुन्हा ओसाड झाल्या. सध्या बहुतांश खुल्या जागांवर परिसरातील कचरा, प्लॅस्टिक आणि टाकाऊ वस्तू टाकल्या जात आहेत. पालिकेकडून या भागांची नियमित साफसफाई केली जात नाही, त्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य दिसून येते.
पालिकेचे आवाहन आणि नागरिकांची अपेक्षा
लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी एकही साधी जागा शहरात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. पूर्वीची प्रमुख उद्याने गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहेत. ही उद्याने विकसित करण्याची आश्वासने पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत दिली जातात, मात्र त्यानंतर ठोस पावले उचलली जात नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले असून नागरिकांनी आपला कचरा घंटागाड्यांतच टाकावा, कुठल्याही खुल्या जागांवर कचरा टाकू नये, असे आवाहन धाराशिवच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले आहे. येत्या काळात या जागांचा सुनियोजित वापर करण्यासाठी शासन व नागरिकांच्या सहभागाने आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply