मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहर आणि उपनगरांमधील एकूण ४८ अपघातप्रवण ठिकाणी रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजना राबवण्यासाठी २२ कोटी सात लाख ७१ हजार ४०८ रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समिती आणि स्थापत्य समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
४८ धोकादायक ठिकाणे निश्चित
मुंबईत वाहनांची संख्या आणि घनता वाढल्यामुळे प्रमुख रस्ते, चौक, उड्डाणपुलांचे उतार, सागरी किनारा मार्ग आणि जोडमार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत मिळालेल्या अहवालानुसार शहरातील एकूण ४८ ब्लॅक स्पॉट्स म्हणजे उच्च जोखमीचे चौक निश्चित करण्यात आले आहेत. या धोकादायक ठिकाणी अपघात रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक कामे हाती घेतली जाणार आहेत.
या कामांमध्ये रस्त्यांवर थर्मोप्लॅस्टिक रोड मार्किंग करणे, मध्य विभाजक पुरवणे आणि बसवणे, गरजेनुसार वाहतूक सूचना व दिशादर्शक फलक उभारणे, द्विमार्गी पेव्हमेंट मार्कर्स म्हणजे रिफ्लेक्टर बसवणे आणि वाहतूक बेटे बांधणे यांचा समावेश आहे.
निविदा प्रक्रिया आणि कामाचा कालावधी
या कामांसाठी महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने ई-निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदारांचे प्रस्ताव आले, त्यामध्ये एका कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ३६ टक्के कमी असा सर्वात कमी दर सादर केला. वस्तू व सेवाकर वगळून, तसेच इतर आकारणींसह एकूण १८ कोटी २४ लाख ६९ हजार ५४४ रुपये इतका प्रत्यक्ष कंत्राट खर्च निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्याचा काळ वगळून हे संपूर्ण काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारावर राहणार आहे.
कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी स्थापत्य समिती शहर आणि स्थापत्य समिती उपनगरे यांच्याकडे, तसेच कंत्राट कराराला मंजुरी मिळण्यासाठी स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव प्रक्रियेनुसार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते अपघातांची कारणे आणि अपघातप्रवण ठिकाणांचा सविस्तर अभ्यास व संपूर्ण आकडेवारी सादर करणे गरजेचे आहे, तरच उपाययोजना किती प्रभावी ठरतात हे तपासता येईल.
Leave a Reply