साक्री तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. कान आणि पांझरा नदीतील या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना दातर्ती येथे घडली. तेथील 54 वर्षीय व्यक्ती रविवारी (25 ऑक्टोबर) पांझरा नदीत मासेमारीसाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते नदीपात्रात बुडाले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत साक्री शहराजवळील सुमंगल मंगल कार्यालयामागील बाजूस असलेल्या नकट्या बंधाऱ्यात पोहताना दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो साक्रीतील इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होता आणि सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. पेपर संपल्यानंतर तो काही मित्रांसह पिंपळनेर रस्त्यावरील सुमंगल कार्यालयामागील नकट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्याबाहेर काढून साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दोन्ही घटनांमुळे साक्री परिसरात शोककळा पसरली आहे.
Leave a Reply