रविवार, १ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाशकंदील

अहिल्यानगरमधील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. प्लास्टिक व फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश.

अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाशकंदील

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सर्जनशीलतेचा संदेश देण्यासाठी अहिल्यानगर शहरातील कापड बाजार परिसरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. ‘प्लास्टिक व फटाकेमुक्त दिवाळी, स्वदेशी वस्तूंची दिवाळी’ असा नारा देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक, रंगीबेरंगी आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले. तसेच विविध रंग, मोती, खडे आणि चमकीच्या साह्याने पणत्या सजवून यंदाची दिवाळी स्वनिर्मित वस्तूंनी साजरी करण्याचा संकल्प केला.

प्लास्टिक व फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश

शाळेच्या कार्यानुभव कार्यशाळेअंतर्गत जीवनकौशल्य विकासाचा भाग म्हणून ‘आकाशकंदील बनवा आणि पणती सजवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून नवीन कौशल्ये शिकता यावीत, स्वतःच्या कल्पनांना कलात्मक रूप देता यावे आणि पर्यावरणाबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या उपक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर यांचे मार्गदर्शन लाभले, तर माध्यमिकचे मुख्याध्यापक महादेव भद्रे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मीनाक्षी खोडदे, ऊर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे आदी उपस्थित होते.

टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कंदील

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू, रंगीत क्राफ्ट पेपर, कागद, दोरे आणि गोंद यांचा वापर करून विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाइनचे आकाशकंदील तयार केले. रंगसंगती, कागदांची कलात्मक मांडणी, सजावटीच्या वस्तूंचा कल्पक वापर आणि नावीन्यपूर्ण रचना यामुळे हे आकाशकंदील लक्षवेधी ठरले. विद्यार्थ्यांनी पणत्या सजविण्याच्या उपक्रमातही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यांनी आपल्या कल्पकतेनुसार केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या चीनी सजावटीच्या वस्तूंच्या तुलनेत भारतीय बनावटीच्या आणि स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा वापर वाढावा, हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. चीनी आकाशकंदिलांऐवजी आपल्या हातांनी बनवलेले स्वदेशी कंदील वापरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्वदेशी उत्पादनांचा सन्मान करणे, स्थानिक वस्तूंना प्राधान्य देणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance