ही गोष्ट आहे मे १९९६ सालची. त्या दिवशी एक विमान अफगाणिस्तानातून सुदानची राजधानी खार्तूमकडे रवाना झालं होतं. या विमानातून ओसामा बिन लादेनला सुदानमधून अफगाणिस्तानात आणण्यात आल्याचा दावा आता समोर आला आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एरियाना अफगाण एअरलाइन्सचे माजी वैमानिक मोहम्मद उमर अफझल यांनी हा दावा केला आहे.
अफझल यांच्या म्हणण्यानुसार, ओसामा बिन लादेन त्याच विमानातून सुदानमधून अफगाणिस्तानात आला होता. मात्र, त्या वेळी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुखही आपल्याच विमानात प्रवास करत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. त्या विमानात बिन लादेनही होता, हे आपल्याला अनेक वर्षांनंतर समजल्याचा त्यांचा दावा आहे.
बिन लादेन हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. मे २०११ मध्ये पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या लष्करी कारवाईत तो मारला गेला.
तो विमानप्रवास कसा होता?
अफझल सांगतात की, या विमानाचे कॅप्टन सैयद नबी आगा होते. त्यांचं आता निधन झालं आहे. सुदान सरकारने हे विमान भाड्यानं घेतलं होतं. दुपारी ३ किंवा ४ च्या सुमारास हे विमान बगरामहून निघालं आणि जलालाबादला पोहोचलं. पेशावरहून येणाऱ्या सुदानी प्रवाशांना त्यांच्या देशात घेऊन जाण्याची योजना होती.
मात्र, विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर हा प्रवास नेहमीसारखा नसल्याचा अंदाज अफझल यांना पहिल्यांदा आला. या विमानाचा कॉल साइन एफजी६०२ होता. सामान्यत: जेद्दाहला जाणाऱ्या विमानांसाठी या कॉल साइनचा वापर केला जात असे. विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत गेल्यानंतर अफझल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी विमान उतरवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, वैमानिकांनी उत्तर दिलं की, आम्ही खार्तूमला जात आहोत.
विमानाला पुढे जाण्याची परवानगी देण्याऐवजी सौदी अधिकाऱ्यांनी त्याला हवेतच थांबण्यास सांगितलं. विमान वाहतुकीच्या भाषेत याला होल्डिंग पॅटर्न म्हणतात. यात विमान एका ठराविक मार्गावर चक्कर मारत हवेतच थांबतं. सौदी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही विमानाची संख्या जेद्दाहसाठी राखीव आहे, पण तुम्ही सुदानला जात आहात. अफझल यांच्या मते, विमान सुमारे ७ मिनिटं किंवा त्याहून थोडा अधिक वेळ हवेत घिरट्या घालत राहिलं. त्यानंतर ३६० अंशांची एक फेरी पूर्ण केल्यावर सौदी अधिकाऱ्यांनी पुन्हा संपर्क साधला आणि विमानाला खार्तूमच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली.
खार्तूममध्ये काय घडलं?
यानंतर विमान सुदानमध्ये पोहोचलं. तिथेही काही अनपेक्षित घटना घडल्या. विमान पार्किंगसाठी एका लष्करी भागात नेण्यात आलं. तिथे लष्करी जवान आणि साध्या वेशातील काही लोक उपस्थित होते. खार्तूमला पोहोचल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांच्या पासपोर्टची तपासणी करण्यात आली नाही किंवा त्यांची कोणतीही चौकशीही झाली नाही. त्यांना थेट हॉटेलमध्ये नेण्यात आलं.
अफझल यांनी एका मुलाखतीत या प्रवासाचा सविस्तर तपशील सांगितला आहे. त्या काळात आपण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असल्याचं त्यांना तेव्हा कळलं नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा