आपल्याला पाहिजे असते एकच वस्तू म्हणून दुकानात जातो खरं, पण बिलिंग काउंटरपर्यंत पोहोचेपर्यंत ट्रॉलीत दहा वस्तू कधी जमा होतात, हे कळतही नाही. असं का होतं, याचा आपण साधा विचार तरी करतो का? याचं उत्तर आहे दुकानात मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेला सेल हा शब्द. तो दिसला की आपला ताबा सुटतोच. पण यात तुमची काहीच चूक नाही. आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेण्यासाठीच हा खरेदीचा हंगाम खूप विचारपूर्वक तयार केला गेला आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी अरब देशांतील लाखो ग्राहकांच्या नजरा दुकानांकडे आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडे लागलेल्या असतात. कंपन्या व्हाईट फ्रायडेच्या नावाखाली ज्या मोठ्या ऑफर्स आणि सवलती जाहीर करतात, त्याचीच ते आतुरतेने वाट पाहत असतात. या काळात काही वस्तूंवर तब्बल ७० टक्के किंवा त्याहूनही जास्त सूट मिळते. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी या भागातील वेगवेगळ्या देशांतील दुकानं आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समध्ये एकमेकांशी चढाओढच लागलेली असते.
ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय?
हाच काळ जगातील प्रसिद्ध शॉपिंग सीझन म्हणजेच ब्लॅक फ्रायडेच्या सोबत येतो. याला जगातील सर्वात मोठ्या सेल आणि विक्रीच्या पर्वणींपैकी एक मानलं जातं. पण अमेरिकेत ज्याला ब्लॅक फ्रायडे म्हणतात, त्यालाच बहुतांश अरब बाजारपेठांमध्ये व्हाईट फ्रायडे का म्हटलं जातं? आणि हा खरेदीचा सीझन जगभरात इतका मोठा कसा काय बनला?
अरब बाजारपेठांमध्ये आज व्हाईट फ्रायडे हे नाव चांगलंच लोकप्रिय झालं असलं, तरी याची खरी सुरुवात जगभरात ब्लॅक फ्रायडे म्हणून प्रसिद्ध असलेल्या शॉपिंग सीझनपासूनच झाली होती. याची पाळंमुळं अमेरिकेत आहेत. याचा थेट संबंध थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवसाशी आहे, जो दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या शुक्रवारी येतो.
मग अरब देशांत याचं नाव का बदललं? तर तिथल्या काही दुकानांनी आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्म्सनी ब्लॅक फ्रायडे ऐवजी व्हाईट फ्रायडे हे नाव जाणीवपूर्वक निवडलं. तिथली सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना अधिक आपलंसं आणि योग्य वाटेल असं नाव देण्यासाठी हा बदल केला गेला. अर्थात यामागची व्यावसायिक संकल्पना मात्र तीच ठेवण्यात आली.
या नावाचा इतिहास किती जुना?
मात्र या अमेरिकन नावाची गोष्ट खरेदीच्या या पर्वापेक्षाही खूप जुनी आहे. ब्लॅक फ्रायडे या शब्दाचा सर्वात पहिला वापर १८६९ मध्ये झाला होता. त्या वेळी अमेरिकेच्या सोन्याच्या बाजारपेठेत एक मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. दोन सट्टेबाजांनी संपूर्ण बाजारपेठ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांचा हा डाव फसला आणि त्यामुळे तिथे मोठी आर्थिक उलथापालथ झाली होती.
या नावाचा खरेदीशी संबंध अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात १९५० च्या दशकात जोडला गेला. त्या काळात थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळासाठी तिथल्या पोलिसांनी पहिल्यांदा ब्लॅक फ्रायडे हा शब्द वापरला होता. कारण या दिवशी खरेदीदार आणि पर्यटक मोठ्या संख्येने शहरात जमायचे. त्यातच नेमका याच काळात अमेरिकन लष्कर आणि नौदलामध्ये दरवर्षी होणारा फुटबॉलचा सामनाही असायचा. त्यामुळे गर्दीत आणखी भर पडायची.
१९६० च्या दशकात हा शब्द चांगलाच लोकप्रिय होऊ लागला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी या नकारात्मक वाटणाऱ्या नावाला सकारात्मक अर्थ देण्याचा प्रयत्न केला. दुकानदारांच्या हिशोबाच्या वह्यांमध्ये काळ्या शाईने लिहिलेले आकडे हे नफ्याचे मानले जातात, तर लाल शाईने लिहिलेले आकडे तोट्याचे मानले जातात. त्यामुळे शुक्रवारचा दिवस दुकानदारांसाठी नफ्याचा दिवस ठरू लागला आणि हळूहळू ब्लॅक फ्रायडे हा जगातील सर्वात मोठा खरेदीचा हंगाम बनला.
प्रतिक्रिया व्यक्त करा