मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव असलेले कलाकार हिंदी चित्रपटांत छोट्या भूमिका का स्वीकारतात, यावरून अनेकदा चर्चा होते. ज्येष्ठ अभिनेते किरण करमरकर यांनी या विषयावर आपलं मत मांडलं असून, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीचा निर्णय स्वतः घेऊ द्यावा, असं ते म्हणाले. एका पॉडकास्टमधील चर्चेत त्यांनी दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा दाखला दिला.
पॉडकास्टमधील चर्चेत काय म्हणाले करमरकर?
अलीकडेच किरण करमरकर यांनी अमोल परचुरे यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले. हिंदी चित्रपटांत मराठी कलाकारांनी केलेल्या कामाबद्दल आणि त्यावर प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल त्यांनी आपलं मत मांडलं. एका मराठी कलाकाराच्या विधानाशी ते सहमत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या कलाकाराचं नाव न घेता करमरकर म्हणाले की, तो कलाकार अनेकदा असं म्हणतो की, मराठी सिनेसृष्टीत एवढे मोठे कलाकार असताना हिंदीत छोट्या भूमिका करणं त्याला पटत नाही. यावर करमरकर यांनी असं मत मांडलं की, प्रत्येकाचं आयुष्य कसं जगायचं, पैसे कसे मिळवायचे आणि आपलं करिअर कसं घडवायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्यानं हिंदीत छोटी भूमिका करणं चुकीचं आहे, असं दुसऱ्यानं ठरवता येणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तसं करू नका, पण दुसऱ्याच्या निर्णयावर भाष्य करू नका, अशी त्यांची भूमिका आहे.
बेर्डे आणि सराफ यांचा दाखला
आपल्या म्हणण्याला बळ देण्यासाठी करमरकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची उदाहरणं दिली. बेर्डे आणि सराफ यांनीही हिंदी चित्रपटांत नोकरांच्या भूमिका केल्या होत्या, असं ते म्हणाले. ते काम चुकीचं, वाईट किंवा खालच्या दर्जाचं होतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्याचं उत्तर नाही असं दिलं. त्यांच्या मते, जसं काम मिळत गेलं तसं ते करत गेले. ज्याच्या हाताला जे लागलं, ते काम त्यांनी केलं. अशोक सराफ किती मोठे अभिनेते आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी हिंदीत कोणत्या भूमिका केल्या, हा वेगळा मुद्दा आहे, असं करमरकर म्हणाले. लक्ष्मीकांत बेर्डे मराठीत नायक होते, पण हिंदीत त्यांनी नायकाचा मित्र किंवा नोकर यांची भूमिका साकारली. त्यातून त्यांना दहापटीने जास्त पैसे मिळाले. त्यांनी पैशांसाठी काम केलं, हे मान्य करत करमरकर म्हणाले की, प्रत्येकाला आपापला निर्णय घेऊ द्या आणि दुसऱ्याचं काय करायचं, हे ठरवू नका.
प्रतिक्रिया व्यक्त करा