१९९२ मध्ये आलेल्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील ‘पहला नशा’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजं आहे. पहिल्या प्रेमाची भावना या गाण्यात इतक्या सुंदर पद्धतीने मांडली गेली आहे की, तीन दशकांहून अधिक काळ उलटूनही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. हे गाणं ऐकताच अनेकांना आपल्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण होते.
या गाण्यात आयशा झुल्का पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा निरागस चेहरा आणि साधा अंदाज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्या लूकची चर्चा आजही सोशल मीडियावर होत असते. आमिर खानने या गाण्यात प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आयशासोबतचे प्रसंग प्रेक्षकांना खूप भावले. भव्य नृत्य किंवा झगमगाट नसतानाही या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
## पहिल्या प्रेमाची आठवण
या गाण्याला उदित नारायण आणि साधना सरगम यांनी आपला आवाज दिला आहे. मन्सूर खान यांच्या चित्रपटातील या गाण्याचं संगीत जतिन-ललित यांनी दिलं होतं. गाण्याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. या सगळ्या कलाकारांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे गाणं अजरामर झालं.
## आजही तितकीच लोकप्रियता
या गाण्याला प्रदर्शित होऊन तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. तरीही आजही प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण या गाण्याचा वापर करतात. सोशल मीडियावरील रील्सपासून ते महाविद्यालयीन कार्यक्रमांपर्यंत या गाण्याची क्रेझ कायम आहे. नवीन पिढीतील प्रेक्षकांनाही हे गाणं तितकंच आवडतं, हीच त्याची खरी ओळख आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा