दोहा येथील वेस्ट एन्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर एका विकेटने सनसनाटी विजय मिळवला. पवन रथनायके याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने या विजयासह तिसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावली. २०१८ नंतर प्रथमच श्रीलंकेने हे विजेतेपद पटकावलं आहे.
पाकिस्तानचं कमबॅक आणि श्रीलंकेची अडचण
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर २१७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेने २८ षटकांत ५ विकेट गमावून १६८ धावा केल्या होत्या आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने ठराविक अंतराने विकेट घेत श्रीलंकेला अडचणीत आणलं. श्रीलंकेची नववी विकेट १९८ धावांवर पडली. त्यावेळी श्रीलंकेला विजयासाठी आणखी १९ धावांची गरज होती, तर पाकिस्तानला फक्त एका विकेटची. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची शक्यता अधिक वाटत होती.
शेवटच्या जोडीने फिरवला सामना
मात्र शेवटच्या जोडीने कमाल केली. लाहिरू समरकून आणि गरुका संकेथ या दोघांनी २९ चेंडूंमध्ये नाबाद २२ धावांची भागीदारी करत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवला. श्रीलंकेने ४१.३ षटकांत २२० धावा करत विजय साकारला आणि ट्रॉफीवर नाव कोरलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा