, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सरकारी नोकरीचा आनंद साजरा करायला निघाले; १३ जणांचा मृत्यू

पत्नीला शिक्षिकेची सरकारी नोकरी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबाचा झारखंडमध्ये भीषण अपघात झाला. यात १३ जणांचा मृत्यू झाला.

सरकारी नोकरीचा आनंद साजरा करायला निघाले; १३ जणांचा मृत्यू

घरात एकाला तरी सरकारी नोकरी असावी, असे अनेक कुटुंबांचे स्वप्न असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आणि नोकरी लागल्याची बातमी मिळताच घरात जल्लोष सुरू होतो. बिहारमधील एका कुटुंबातही असाच आनंद होता. पत्नीला शिक्षिका म्हणून सरकारी नोकरी लागली होती आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब देवदर्शनाला निघाले होते. मात्र रस्त्यात झालेल्या भीषण अपघातात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

राजरप्पा मंदिराच्या दर्शनाला जाताना अपघात

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बेन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी विवेकानंद यांच्या पत्नी अमृता कुमारी यांना शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी सगळं कुटुंब झारखंडमधील राजरप्पा मंदिरातील देवाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. घरातील तीन मुले, आई, पत्नी आणि विवेकानंद असे सगळे दर्शनाला निघाले होते. २९ तारखेला ही दुर्घटना घडली.

झारखंडच्या दिशेने जात असताना रामगढ जिल्ह्यात रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओचे तुकडे झाले आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी आहे.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

अपघात घडल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. हा अपघात कुजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला होता. जखमींना रामगढ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance