राज्यात आणि देशात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सहा खासदारांपुढे कायदेशीर पेच का?
ठाकरे गटाला सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांनादेखील उद्धव ठाकरे यांनी व्हीप बजावला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा न देण्यासंदर्भातील हा व्हीप आहे. त्यामुळे या सहा खासदारांपुढे मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ खासदार निवडून आले होते. यापैकी सहा खासदारांनी जुलै २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र या खासदारांनादेखील उद्धव ठाकरे यांनी व्हीप बजावला आहे. अचानक अशा प्रकारे व्हीप बजावण्यात आल्याने बेसावध असलेल्या सहा खासदारांना धक्का बसला आहे. खासदारांनी पक्षाच्या व्हीपविरोधात मतदान केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
वकील असीम सरोदे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी सहा खासदारांना पक्षातून निलंबित केलेले नाही. त्यामुळे ते तांत्रिक दृष्टीकोनातून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरून निवडून आलेले खासदार आहेत, असे वकील असीम सरोदे म्हणाले. त्यांची वागणूक दुसऱ्या गटाला पाठिंबा देण्यासाठी गेल्याचे दर्शवते. त्याबद्दल अपात्रतेच्या कायद्याच्या परिच्छेद २ (१) (ए) नुसार त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचेही सरोदे म्हणाले.
अपात्रतेच्या कायद्याच्या परिच्छेद २ (१) (ए) च्या तरतुदीनुसार त्यांच्या वागणुकीनुसार ते अपात्र ठरतात, असा दावा सरोदे यांनी केला. दुसऱ्या परिच्छेद २ (१) (बी) नुसार त्यांनी व्हीपचा अनादर केला किंवा पक्षाच्या आदेशाचे पालन न करता ज्यांना मदत करायची नाही त्यांना मतदान केले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल, असेही सरोदे म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. लोकसभेच्या अध्यक्षांनी फक्त एवढेच लिहिले आहे की, या सहा सदस्यांना वेगळे बसवण्याची अनुमती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील प्रवेशाला कायदेशीर अनुमती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कायदेशीर व्हीप दिला आहे, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. आता या प्रकरणात काय घडामोडी घडतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा