सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भन्नाट नृत्य, तर कधी रस्त्यावरील वादविवाद असे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात असा काही अद्भुत नजारा टिपला आहे की तो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये हवेत तरंगणारे मालवाहू जहाज दिसत आहे. नेमकी या व्हिडिओमागची गोष्ट काय आहे, हे जाणून घेऊया.
हा व्हिडिओ संयुक्त अरब अमिरातीमधील अजमानच्या किनाऱ्यावरचा आहे. व्हिडिओमध्ये एक मोठे मालवाहू जहाज दिसत आहे. त्याचा लांब डेक आणि पांढरा सांगाडा निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे दिसतो. जहाजाच्या सांगाड्याखालील गडद पाण्याच्या पट्ट्यामुळे जहाज समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे अनोखे दृश्य मूळचे केरळमधील कोझिकोडचे रहिवासी असलेल्या २८ वर्षीय जसील पेरालासेरी यांनी टिपले आहे. ते जसील अझीझ या नावानेही ओळखले जातात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल ३१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमुळे जसील रातोरात प्रसिद्ध झाले आहेत.
भास कसा निर्माण झाला
जसील यांनी सांगितले की, अजमानमध्ये एका चित्रीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. तिथे एका विलक्षण गोष्टीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. समुद्राकडे पाहिल्यावर त्यांना दूरवर काही जहाजे दिसली, जी पाण्यावर तरंगत असल्यासारखी वाटत होती. जहाजांच्या सांगाड्यांमध्ये आणि समुद्राच्या पृष्ठभागामध्ये एक मोकळी जागा दिसत होती. हा भास निर्माण होण्यामागे जहाजाखालील गडद पाण्याचा पट्टा कारणीभूत ठरला. खरे तर जहाज पाण्यावरच तरंगत होते, पण त्या गडद पट्ट्यामुळे ते हवेत असल्यासारखे दिसत होते.
२० तासांत ३१ दशलक्ष व्ह्यूज
उत्सुकतेपोटी जसील यांनी लगेच आपला फोन काढला आणि हे अनोखे दृश्य रेकॉर्ड केले. हा व्हिडिओ ऑनलाइन इतका लोकप्रिय होईल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. दृश्य पाहिल्यावर त्यांनी ते थेट ऑनलाइन पोस्ट केले. त्यांनी सांगितले की, त्यांनी फक्त चित्रीकरण करून व्हिडिओ पोस्ट केला होता आणि २० तासांत ३१ दशलक्ष व्ह्यूज मिळतील, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. या एका व्हिडिओने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा