, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मार्गशीर्ष ९ डिसेंबरपासून; महालक्ष्मी व्रताचे यंदा ५ गुरुवार

मार्गशीर्ष महिना ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदा महालक्ष्मी व्रतासाठी पाच गुरुवार असून व्रत १० डिसेंबरपासून सुरू होईल. पूजा मांडणी आणि पद्धत जाणून घ्या.

मार्गशीर्ष ९ डिसेंबरपासून; महालक्ष्मी व्रताचे यंदा ५ गुरुवार

दिवाळीचा सण संपल्यानंतर आता भाविक मार्गशीर्ष महिन्याकडे डोळे लावून बसले आहेत. हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. याच महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जाते आणि दर गुरुवारी उपवास पाळला जातो. त्यामुळे हा महिना नेमका कधीपासून सुरू होत आहे, यंदा किती गुरुवार येणार आहेत आणि व्रताची पद्धत काय आहे, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

मराठी पंचांगानुसार यंदा म्हणजेच २०२६ मध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ९ डिसेंबर, बुधवारपासून होत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला प्रारंभ होणार आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी महिला या दिवशी घटस्थापना करतात, देवीची पूजा करतात आणि व्रताची कथा वाचतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचीही उपासना केली जाते. विशेष बाब म्हणजे यंदा महालक्ष्मी व्रतासाठी एकूण पाच गुरुवार येणार आहेत.

व्रताची पूजा मांडणी कशी करावी

गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. महालक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्याच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी.

चौरंगावर गोलाकार तांदूळ पसरून त्यात तांब्याचा कलश ठेवावा. कलशात एक रुपयाचे नाणे टाकावे, त्याला हळद-कुंकू लावावे आणि त्यात नारळ ठेवावा. नारळाभोवती पाच वेगवेगळ्या झाडांची पाने ठेवावीत. काहीजण नारळ सजवून त्याला देवीचे रूप देतात. चौरंगावर एका बाजूला पाच फळे ठेवावीत, तर दुसऱ्या बाजूला विड्याची पाने आणि त्यावर देवीचा शृंगार ठेवावा. त्यासोबत महालक्ष्मी व्रतकथेचे पुस्तकही ठेवून त्याची पूजा करावी. देवीला हळद-कुंकू वाहावे, हार घालावा, फुले अर्पण करावीत आणि फुलांची वेणीही घालावी. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावावी.

कथा, आरती आणि प्रसाद

पूजेची मांडणी पूर्ण झाल्यानंतर देवीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी. हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने पार पाडू, असे देवीला सांगावे. त्यानंतर देवीच्या मंत्राची एक माळ जप करावी आणि महालक्ष्मी व्रताची कथा वाचण्यास सुरुवात करावी. मनोभावे कथेचे वाचन करावे. कथा संपल्यानंतर देवीची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि सर्वांना प्रसाद वाटावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत पाळले जाते.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance