तुम्हीही दिसायला दमदार आणि चालायला जोरदार एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासमोर दोन पर्याय येतात. पहिली म्हणजे टाटाची हॅरियर आणि दुसरी महिंद्रा XUV 7XO. दोन्ही गाड्या दमदार टर्बो इंजिन, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तसेच आरामदायक फिचर्स आणि सेफ्टीसाठी ओळखल्या जातात. दोन्ही गाड्यांमध्ये समान फिचर्स दिसत असले तरी काही मोठे फरकही आहेत. त्यामुळे कोणती गाडी घ्यावी, याबाबत गोंधळ होणे स्वाभाविक आहे. किंमत, इंजिन, मायलेज आणि फिचर्सच्या आधारे कोणती गाडी शक्तीशाली आहे, ते जाणून घ्या.
किंमत आणि इंजिनची तुलना
टाटा हॅरियरची एक्स-शोरूम किंमत १३ लाख रुपये ते २६.११ लाख रुपये पर्यंत आहे. ही गाडी १.५-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि २.०-लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, महिंद्रा XUV 7XO ची किंमत १३.९९ लाख रुपये ते २५.७९ लाख रुपये दरम्यान आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तिच्या काही डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट्समध्ये AWD सिस्टीमदेखील आहे.
हॅरियरमधील १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १६८ bhp आणि २८० Nm टॉर्क निर्माण करते. तिचे २.०-लिटर टर्बो डिझेल इंजिन देखील १६८ bhp आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. हॅरियरमध्ये AWD उपलब्ध नाही.
XUV 7XO मधील २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन २०१ bhp आणि ३८० Nm टॉर्क निर्माण करते. २.२-लिटर डिझेल इंजिन मॅन्युअलमध्ये १८२ bhp आणि ४२० Nm टॉर्क, तर ऑटोमॅटिकमध्ये ४५० Nm टॉर्क निर्माण करते. मायलेजच्या बाबतीत, हॅरियर डिझेलला ARAI-प्रमाणित १६.८ किमी प्रति लिटर मायलेज मिळते. कंपनीने पेट्रोल व्हर्जन आणि XUV 7XO च्या इंजिनसाठी अधिकृत ARAI मायलेज आकडेवारी जाहीर केलेली नाही.
फिचर्स, सेफ्टी आणि कोणती घ्यावी?
हॅरियरमध्ये १०.२५-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेरा आणि JBL साउंड सिस्टीम आहे. XUV 7XO मध्ये तीन १२.३-इंचाचे स्क्रीन्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. याच्या टॉप व्हेरियंटमध्ये १६-स्पीकर हर्मन कार्डन साउंड सिस्टीम, ५४०-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट व रिअर सीट्स आहेत.
दोन्ही एसयूव्हींना भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हॅरियरने प्रौढ प्रवासी सुरक्षेत ३२ पैकी ३०.०८ आणि लहान मुलांच्या सुरक्षेत ४९ पैकी ४४.५४ गुण मिळवले आहेत. दरम्यान, XUV 7XO ने प्रौढ प्रवासी सुरक्षेमध्ये ३२ पैकी ३०.७६ आणि लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये ४९ पैकी ४४.९७ गुण मिळवले आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल स्टँडर्ड म्हणून मिळतात.
जर तुम्ही चांगली केबिन स्पेस, शक्तिशाली इंजिन आणि कमी सुरुवातीची किंमत असलेली ५-सीटर एसयूव्ही शोधत असाल, तर टाटा हॅरियरचा विचार करा. मोठ्या कुटुंबासाठी, जिथे सहा किंवा सात सीट्स, अधिक पॉवर आणि AWD चा पर्याय आवश्यक आहे, तिथे महिंद्रा XUV 7XO एक चांगला पर्याय असू शकतो. सरतेशेवटी, तुम्हाला ५-सीटरचा आराम हवा आहे की अधिक सीट्स आणि फीचर्स असलेली मोठी एसयूव्ही हवी आहे, यावर तुमची निवड अवलंबून असेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा