राज्यातील शाळांच्या ग्रंथालयांसाठी शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांची निवड झाली आहे. समग्र शिक्षा आणि पीएम-श्री योजनेंतर्गत सुमारे २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून १६७ पुस्तकांची अंतिम निवड करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी), पुणे येथे ही निवड प्रक्रिया पार पाडली.
५७० पुस्तकांमधून काटेकोर छाननी
सन २०२४-२५ मध्ये या उपक्रमातून २३० पुस्तके आणि २४८ लेखकांनी भाग घेतला होता. सन २०२५-२६ मध्ये ३४४ पुस्तके आणि ४०० लेखक सहभागी झाले होते. सन २०२६-२७ साठी १७५ पुस्तके लिहिण्याचा मानस होता. मात्र प्रत्यक्षात भंडारा जिल्हा वगळता राज्यातील ३५ जिल्ह्यांकडून विविध स्तर आणि माध्यमांतून एकूण ५७० पुस्तके प्राप्त झाली.
दि. ८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान एससीईआरटी, पुणे येथे आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत राज्यस्तरीय पुस्तक निवड व संपादन समितीच्या ४७ पैकी ३५ सदस्यांनी या पुस्तकांची छाननी केली. यावेळी लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव आणि जिल्ह्याची माहिती झाकून प्रत्येक पुस्तकाला कोड नंबर देण्यात आला होता, जेणेकरून निवड प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि निष्पक्ष राहील.
कोणत्या भाषेत किती पुस्तके?
निवड झालेल्या १६७ पुस्तकांमध्ये मराठी भाषेतील ११२, उर्दू भाषेतील २३, इंग्रजी भाषेतील २० आणि हिंदी भाषेतील १२ पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तकांची वयोगटनिहाय उपयुक्तता, भाषाशैली, संकल्पनात्मक स्पष्टता, शैक्षणिक मूल्य आणि व्याकरणदृष्ट्या सखोल परीक्षण करून मेरीट लिस्ट तयार करण्यात आली. उपलब्ध अनुदान आणि शाळांची संख्या लक्षात घेऊन कट-ऑफ निश्चित करण्यात आला.
या निवडीमुळे राज्यातील शाळांच्या ग्रंथालयांना शिक्षकांच्या अनुभवातून लिहिलेली दर्जेदार पुस्तके मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्कृतीला यामुळे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा