आजकालच्या बदलत्या काळात महिलांच्या अधिकारांबाबत चर्चा रंगत असली, तरी प्रजनन आरोग्याच्या बाबतीत महिलांना अजूनही पूर्ण मोकळीक मिळालेली नाही. हे वास्तव बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज विक्री प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या कायदेशीर असलेली स्त्रीबीज दान प्रक्रिया प्रत्यक्षात अनेक महिलांना दान करण्याऐवजी लपूनछपून करावी किंवा विकावी लागते, हा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे.
स्त्रीबीजदान प्रक्रियेतील नियम आणि वास्तव काय आहे, तसेच अनधिकृत व्यवहारांचा मुद्दा या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न की आर्थिक शोषणाचा मार्ग, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
स्त्रीबीजदानाला समाजाचा संकोच आणि व्यवस्थेची मर्यादा या दोन्ही गोष्टी अडथळा ठरत आहेत. या प्रक्रियेबाबत उघडपणे बोलणे आजही अनेकांना अवघड वाटते. त्यामुळे गरज असूनही अनेक महिला अधिकृत मार्गाने ही प्रक्रिया करू शकत नाहीत, आणि त्यातूनच अनधिकृत व्यवहारांना वाव मिळतो, असे या प्रकरणातून दिसून येते.
कायदेशीर प्रक्रिया, पण व्यवहारात अडचणी
आर्थिक गरज, बेकायदेशीर एजंटांचे जाळे, सामाजिक दबाव आणि अधिकृत व्यवस्थेतील मर्यादा अशा अनेक बाबींची बंधने महिलांवर आजही आहेत. अनेकदा या व्यवहारात दलालीचे जाळे निर्माण होते आणि कुठे तरी त्यात मतभेद निर्माण झाल्यावरच अशी प्रकरणे बाहेर येत असल्याची टीका होत आहे.
वंध्यत्व उपचारांमध्ये शुक्राणू दान आणि स्त्रीबीज दान या दोन्ही प्रक्रिया महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांच्यातील फरक लक्षणीय आहे. स्त्रीबीजदान ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते, त्यामुळे त्याभोवती अनेक प्रश्न निर्माण होतात.
ग्रामीण भागात सुविधांची कमतरता
तज्ज्ञांच्या मते वैद्यकीयदृष्ट्या बीजांडांची गरज वाढत असली, तरी प्रत्यक्षात उपलब्धता कमी असल्याचे चित्र दिसते. राज्यात अनेक एआरटी क्लिनिक कार्यरत असली, तरी अधिकृत एआरटी बँकांची संख्या तुलनेने मर्यादित आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा सुविधा अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परिणामी काही ठिकाणी बेकायदेशीर एजंट किंवा दलाल सक्रिय होऊन महिलांचे शोषण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अधिकृत व्यवस्था बळकट करणे आणि महिलांमध्ये या प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील पोकळी उघड झाली आहे. अधिकृत बँकांची संख्या वाढवणे, ग्रामीण भागात सुविधा पोहोचवणे आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, या गोष्टींवर भर देण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा