कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ लवकरच आपल्या सदस्यांना पूर्णपणे बँकेसारख्या सेवा देण्याची तयारी करत आहे. ईपीएफओ ३.० अंतर्गत त्वरित व्याज देणे, यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे निधी जमा करण्याची व काढण्याची सुविधा यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे पीएफचे पैसे काढणे बँक खात्यातून पैसे काढण्याइतके सोपे होणार आहे.
ईपीएफओ प्रमुख आणि केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी एका विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यूपीआयद्वारे पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक चाचणी पूर्ण झाली आहे आणि ही योजना कधीही लागू केली जाऊ शकते. सुरुवातीला पैसे काढण्याच्या मर्यादेसह ही सुविधा सुरू होणार आहे.
ईपीएफओ ३.० मध्ये बँकेसारख्या सुविधा
कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले की, ईपीएफओ ३.० प्रकल्प काही दिवसांत सुरू केला जात आहे. यामध्ये कोअर बँकिंगसारख्या सुविधा असतील. बँक खात्याप्रमाणेच सदस्यांना यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची किंवा कधीही पैसे काढण्याची सोय मिळेल आणि त्वरित व्याजही मिळेल. एका वर्षाच्या आत ही सुविधा सुरू करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्यांचे सर्व लेजर कोअर बँकिंगमध्ये जातील. याचा अर्थ खातेवही तेथे असलेल्या सॉफ्टवेअरशी जोडली जाईल. त्यामुळे खाते पाहणे, पैसे जमा करणे आणि पैसे काढणे सोपे होईल, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
व्हॉट्सॲप सेवेवर १२.५ दशलक्ष सदस्य
सेवा सुधारणांचा एक भाग म्हणून ईपीएफओने या महिन्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. पीएफ ठेवी आणि पासबुक पाहण्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदस्यांना त्यांच्या खात्यांमध्ये सहज प्रवेश मिळावा यासाठी १ नोव्हेंबर रोजी ही सेवा सुरू करण्यात आली.
तीन आठवड्यांच्या आत अंदाजे १२.५ दशलक्ष सदस्यांनी या व्हॉट्सॲप सेवेचा वापर सुरू केला आहे, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले. सदस्यांना बँकेसारख्या सेवा देणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गिग वर्कर्ससाठीही खास तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहितेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, म्हणजेच गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा योजनेशी जोडण्याची तरतूद आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा