स्मार्टफोन आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात दिवसभर फोन असतो. सततच्या वापरामुळे फोनवर घाम, धूळ, तेल आणि बोटांचे ठसे जमा होतात. फोनची स्क्रिन, कॅमेऱ्याची लेन्स आणि चार्जिंग पोर्ट खराब न होता स्वच्छ कसे ठेवावे, हे जाणून घेऊया.
फोन स्वच्छ करण्यापूर्वीची तयारी
स्मार्टफोन स्वच्छ करण्यापूर्वी फोन बंद करा आणि तो चार्ज होत असल्यास चार्जरवरून बाजूला काढा. त्यानंतर एक स्वच्छ सुती किंवा मायक्रोफायबर कापड घेऊन फोनची स्क्रिन आणि मागची बाजू हळुवारपणे पुसून घ्या.
स्क्रिन, लेन्स आणि चार्जिंग पोर्टची काळजी
स्क्रिनवर बोटांचे ठसे आणि घाम साचल्याने ती धुरकट दिसते. सुती किंवा मायक्रोफायबर कापडाने जास्त दाब न देता हळुवार गोल फिरवून स्क्रिन पुसावी. कॅमेऱ्याच्या लेन्सवर धूळ किंवा बोटांचे डाग पडल्यास फोटो आणि व्हिडिओची स्पष्टता कमी होते. लेन्सवर ओरखडे पडू नयेत म्हणून मऊ मायक्रोफायबर कापडाने लेन्स हळुवारपणे स्वच्छ करावी.
फोन खिशात किंवा बॅगेत ठेवल्याने चार्जिंग पोर्टमध्ये धुळीचे लहान कण साचतात, ज्यामुळे चार्जिंग केबल नीट लागत नाही. मात्र, चार्जिंग पोर्ट स्वच्छ करण्यासाठी टाचणी, सुई किंवा इतर कोणतीही धातूची वस्तू वापरू नये. अत्तर, सॅनिटायझर किंवा पाण्याचा वापर करून फोन स्वच्छ करणे टाळावे. यामुळे फोनच्या स्क्रिनचे नुकसान होऊ शकते.
नियमितपणे योग्य पद्धतीने फोन स्वच्छ ठेवल्यास त्याची स्क्रिन, कॅमेरा आणि चार्जिंग पोर्ट जास्त काळ चांगल्या स्थितीत राहतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा