बचत केलेल्या पैशांवर दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. विशेषतः निवृत्तीनंतर नियमित पैशांची सोय व्हावी, यासाठी अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम हा एक पर्याय आहे. या योजनेत एकरकमी पैसे जमा केल्यानंतर त्यावर दर महिन्याला व्याज मिळते.
किती गुंतवणूक करता येते
पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम ही केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला व्याज मिळते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला ठराविक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. या योजनेत मिळणारा व्याजदर खाते उघडताना लागू असलेल्या दरानुसार निश्चित होतो. या योजनेत किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. एका व्यक्तीच्या नावाने खाते उघडल्यास जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवण्याची मर्यादा आहे. संयुक्त खाते जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती मिळून उघडू शकतात.
दरमहा किती व्याज मिळते
सध्या लागू असलेल्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदरानुसार, 9 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा 5,550 रुपये व्याज मिळू शकते. तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केल्यास दरमहा 9,250 रुपये व्याज मिळू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने या योजनेत 9 लाख रुपये गुंतवले, तर त्याला पाच वर्षे दरमहा 5,550 रुपये मिळतील. पाच वर्षांत एकूण 3 लाख 33 हजार रुपये व्याज मिळेल. मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ गुंतवलेली 9 लाख रुपयांची रक्कम परत मिळते.
प्रतिक्रिया व्यक्त करा