फाटक्या आणि मळक्या नोटांपासून सामान्य नागरिकांना लवकरच सुटका मिळणार आहे. अनेकदा बाजारात १० किंवा २० रुपयांची फाटलेली नोट मिळते आणि त्यामुळे व्यवहार करताना अडचण येते. ही अडचण दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटांऐवजी पॉलिमर नोटा आणत आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे.
## एटीएममध्ये मोठ्या बदलाची गरज नाही
साधारणपणे नोटांचा आकार बदलला की एटीएम मशीनमध्येही बदल करावा लागतो. नोट ओळखणारा सेन्सर, कॅश कॅसेट आणि इतर तांत्रिक सेटिंग्ज बदलाव्या लागतात. त्यासाठी बँकांना अतिरिक्त खर्च येतो. मात्र रिझर्व्ह बँक यंदा नवीन पॉलिमर नोटांचा आकार सध्याच्या १० आणि २० रुपयांच्या नोटांप्रमाणेच ठेवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे नवीन नोटा एटीएम स्लॉट आणि कॅश कॅसेटमध्ये सहज बसतील. मशीनमध्ये मोठे बदल करण्याची गरज भासणार नाही. काही तांत्रिक सेटिंग्ज मात्र बदलाव्या लागतील.
## पायलट प्रकल्प कसा राबवला जाणार?
रिझर्व्ह बँकेने या पायलट प्रकल्पासाठी एकूण २०० कोटी पॉलिमर नोटा छापण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात १० रुपयांच्या १०० कोटी नोटा आणि २० रुपयांच्या १०० कोटी नोटांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेची उपकंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडला नोटा छापण्यासाठी आतापर्यंत सहा कंपन्यांकडून निविदा आल्या आहेत. पॉलिमर सायन्स कंपनी युफ्लेक्सने अमेरिकन कंपनी स्पेक्ट्रा सिस्टिमसह मोठी बोली लावली आहे.
## एप्रिल २०२७ पासून बाजारात येण्याची शक्यता
सध्याच्या योजनेनुसार एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा बाजारात येण्याची शक्यता आहे. या नोटा पायलट प्रकल्पांतर्गत बाजारात येतील. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात आणि काही निवडक ठिकाणीच या नोटा वापरात येतील. त्यांची चाचणी आणि तपासणी केली जाईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रिया आणि वातावरणाचा या नोटांवर होणारा परिणाम पाहिल्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात या नोटा बाजारात आणल्या जातील.
प्रतिक्रिया व्यक्त करा