सकाळी नियमित चालणं हे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण केवळ चालण्यापुरतं न थांबता त्यासोबत काही सोपी योगासनं केल्यास शरीराला अधिक फायदा होतो. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू सक्रिय राहतात. वॉकदरम्यान सहज करता येणारी पाच आसनं जाणून घेतल्यास कमी वेळात चालणं आणि योग या दोन्हींचा लाभ घेता येतो.
वॉकदरम्यान करता येणारी पाच आसनं
साईड बॉडी स्ट्रेचसाठी पाय कंबरेच्या रुंदीइतके दूर ठेवून सरळ उभं राहावं. दोन्ही हात डोक्यावर न्यावेत आणि एका हाताने दुसरा हात पकडून शरीर हळूहळू विरुद्ध बाजूला ताणावं. काही क्षण त्या स्थितीत राहून दुसऱ्या बाजूनेही हीच क्रिया करावी. यामुळे शरीराच्या बाजूचे स्नायू ताणले जातात आणि त्यांना आराम मिळतो.
खांदे आणि पाठीचा वरचा भाग ताणण्यासाठी गरुडासन उपयुक्त आहे. यात उजवा हात डाव्या हाताखाली आणून कोपर एकमेकांवर ठेवावेत आणि तळवे एकमेकांसमोर आणावेत. कोपर वर उचलल्यावर पाठीच्या वरच्या भागात ताण जाणवतो. या स्थितीत पाच खोल श्वास घेऊन बाजू बदलावी.
संपूर्ण पाठेला आराम देण्यासाठी पुढे वाकून केलेलं आसन करता येतं. पाय कंबरेइतके दूर ठेवून पुढे वाकावं, गुडघे थोडे वाकवावेत आणि हात जमिनीवर ठेवावेत. पाठ सैल करण्यासाठी हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला झुलावं आणि खोल श्वास घ्यावेत.
शरीराचा तोल आणि एकाग्रता सुधारण्यासाठी वृक्षासन करता येतं. सर्व वजन एका पायावर देऊन दुसरा पाय वर उचलावा आणि तो नडगीच्या किंवा मांडीच्या आतील बाजूला ठेवावा. दोन्ही तळवे छातीसमोर जोडावेत किंवा हात डोक्यावर न्यावेत. संतुलन राखत खोल श्वास घेऊन दुसऱ्या पायानेही हे आसन करावं.
शेवटच्या आसनासाठी पाय कंबरेपेक्षा रुंद अंतरावर ठेवून उभं राहावं. हात कंबरेवर ठेवून कंबरेपासून पुढे वाकावं आणि हात जमिनीवर किंवा गुडघ्यांवर ठेवावेत. श्वास घेताना पाठीचा कणा सरळ करावा आणि श्वास सोडताना आणखी खोलवर जावं. हात पायांमध्ये घेऊन पाच ते दहा श्वासांपर्यंत थांबावं.
नियमित सरावाचे फायदे
ही आसनं वॉकदरम्यान सहज करता येतात आणि त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. त्यामुळे रोजचा फिटनेस दिनक्रम अधिक प्रभावी होतो. मात्र कोणतंही नवीन आसन सुरू करण्यापूर्वी शरीराची क्षमता लक्षात घ्यावी आणि त्रास जाणवल्यास थांबावं. नियमित सरावामुळे लवचिकता, स्नायूंची ताकद आणि संतुलन यात सुधारणा होण्यास मदत होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा