बोपदेव घाटाच्या पायथ्यालगत केजे कॉलेजसमोरील रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेतून विद्यार्थी आणि पालक अद्याप सावरलेले नसतानाच याच घाटात पुन्हा एका ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक कठड्याला धडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र सलग अपघातांमुळे बोपदेव घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी काय घडले होते?
केजे कॅम्पसच्या ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा पहिला पेपर सुटल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी कॉलेजसमोरील रस्त्यावर बसची वाट पाहत होते. त्याचवेळी सासवडकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या अपघातात सिद्धेश राजे, विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.
प्रशासनाकडून उपाययोजनांची मागणी
एकाच अपघातात तीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतरही पोलीस प्रशासन, रस्ते वाहतूक विभाग आणि रस्ते बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. घाटातील वाहतूक, वेगमर्यादा, सुरक्षा कठडे, सूचना फलक आणि बसथांब्याची व्यवस्था याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कॉलेजचा बसथांबा घाटाच्या तीव्र उतारालगत असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी बसची वाट पाहतात. वाहनांची सोय असलेले विद्यार्थी तातडीने निघून जातात; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. उन्हाळा आणि पावसात विद्यार्थ्यांना रस्त्यालगत उभे राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवारा उभारण्याची मागणी पालकांकडून होत आहे. केजे कॉलेजसमोरील हॉटेलजवळ मोठी मोकळी जागा उपलब्ध आहे. एसटी बस हॉटेलसमोरील जागेत थांबवल्यास विद्यार्थ्यांना थेट महामार्गालगत उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सुरक्षित बसथांबा निश्चित करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा