रेट्रो लूक असलेल्या बाइकची आवड असणाऱ्यांसाठी नव्या वर्षाच्या स्क्रॅम्बलर मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नव्या इंधन टाकी, रेसिंग शैलीतील नंबर बोर्ड आणि रिब्ड सीटमुळे बाइकचा लूक अधिक आकर्षक झाला आहे. आधीच्या दुहेरी एक्झॉस्टऐवजी आता एकच एक्झॉस्ट देण्यात आला आहे. पुढील १९ इंच आणि मागील १७ इंच वायर-स्पोक चाकांमुळे बाइकला खरा स्क्रॅम्बलर अंदाज मिळतो.
इंजिन आणि कामगिरी
या बाइकमध्ये ३३४ सीसीचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ३० पीएस पॉवर आणि ३० एनएम टॉर्क निर्माण करते. सोबत सहा स्पीडचा गिअरबॉक्स मिळतो. शहरातील वाहतुकीत बाइक सहज चालते आणि समोरच्या वाहनाला ओलांडतानाही चांगला प्रतिसाद देते. चाचणीदरम्यान बाइक १२० किमी प्रतितास वेगापर्यंत चालवण्यात आली. या वेगातही नियंत्रण आणि स्थिरता चांगली जाणवली. मात्र जास्त वेगात इंजिनचे कंपन वाढते, त्यामुळे सतत वेगाने चालवणाऱ्यांना थोडा त्रास होऊ शकतो.
आराम आणि हँडलिंग
बाइकची सीट उंची ८१३ मिमी असून रुंद हँडलबारमुळे बसण्याची स्थिती आरामदायक राहते. पण सीटचा आकार लहान असल्याने २५ ते ३० किलोमीटर प्रवासानंतरही कंबरेच्या भागात दुखणे जाणवू शकते. लांब प्रवासासाठी ही सीट थोडी अस्वस्थ ठरू शकते आणि मागे बसणाऱ्यासाठीही जागा मर्यादित आहे. खराब रस्त्यांवरही सस्पेंशन चांगले काम करते. समोर १५० मिमी ट्रॅव्हल असलेला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे १३० मिमी व्हील ट्रॅव्हलसह ट्विन शॉक अॅब्जॉर्बर देण्यात आले आहेत. १७४ किलो वजन आणि १,४०३ मिमी व्हीलबेसमुळे वाहतूक, अरुंद रस्ते आणि वळणांवर बाइक सहज हाताळता येते.
एकूणच ही बाइक दमदार इंजिन, चांगली हँडलिंग आणि आकर्षक डिझाइन असलेला पर्याय आहे. रोजच्या वापरासाठी आणि अधूनमधून महामार्गावरील प्रवासासाठी ती चांगली ठरू शकते. मात्र लांब प्रवास, सीटचा आराम आणि जास्त वेगातील कंपन या गोष्टी लक्षात घेऊन टेस्ट राइड घेतल्यानंतरच खरेदीचा निर्णय घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा