सध्या संपूर्ण देशात डिलिमिटेशन बिलावरून वाद पेटला आहे. सत्ताधारी आघाडी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे लोकशाही संकटात येईल, असा दावा इंडिया आघाडीने केला आहे. या विधेयकाला आघाडीकडून विरोध केला जात असला तरी यातील काही पक्षांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या असून आघाडीतील तणाव कमी करण्यासाठी आणि आघाडीतील फूट टाळण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे.
चेन्नई दौऱ्यामागचा उद्देश
दिल्लीत असतानाच राहुल गांधी यांनी थेट चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला असून ते द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागे मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याची विनंती करणे हा मुख्य उद्देश आहे. राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि मी, थिरू एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला जात आहोत. आम्ही त्यांना आणि द्रमुक पक्षाला विनंती करणार आहोत की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करावा. त्यांनी स्टॅलिन यांचा बंधू असा उल्लेख करत आपुलकी व्यक्त केली आहे.
८५० जागांचा इशारा आणि द्रमुकचे उत्तर
राहुल गांधी यांच्या मते, लोकसभेतील जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवणे म्हणजे भारतातील लोकशाहीचा अंत ठरेल. यामुळे भाजप-आरएसएसला देशाचा संपूर्ण निवडणूक नकाशा त्यांच्या फायद्यासाठी पुन्हा आखण्याची अमर्याद संधी मिळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. स्टॅलिन यांच्या भूमिकेची प्रशंसा करताना ते म्हणाले की, स्टॅलिन नेहमीच तामिळविरोधी शक्तींच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रीय हित, तामिळनाडूचे हित आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन या विधेयकाचा पराभव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
द्रमुकने यापूर्वी सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या काही तरतुदींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. राहुल गांधी यांच्या या अचानक चेन्नई दौऱ्याला याच पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या सुधारित विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या टीकेला द्रमुकने सडेतोड उत्तर दिले होते. द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी शनिवारी म्हटले की, अनेक पक्ष असा प्रश्न उपस्थित करत आहेत की एखाद्या विशिष्ट विधेयकाचे समर्थन करणे म्हणजे भाजपसोबत युती करणे आहे. याच पक्षांनी भाजपचे समर्थन केले होते, जेव्हा त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाचे विधेयक आणले होते. विशेषतः कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनेही त्या विधेयकाला पाठिंबा दिला होता. जर अशीच गोष्ट असेल, तर आपण असे म्हणू शकतो का की काँग्रेसने भाजपसोबत युती केली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा