जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे मतदान सुरू असताना महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले. चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात बंडखोर उमेदवारांच्या बूथवर माजी खासदार उन्मेष पाटील थांबून असल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही सक्रिय न दिसलेले पाटील मतदानाच्या दिवशी थेट बंडखोरांच्या बूथवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
चाळीसगावमध्ये थेट लढत
चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिंदे सेनेचे दोन बंडखोर उमेदवार उभे असून त्यांनी चव्हाण यांना कडवे आव्हान दिले आहे. महायुतीचा घटक असलेल्या शिंदे सेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील हे थेट बंडखोरांच्या बूथवर दिसल्याने चाळीसगावमधील राजकीय समीकरणे आणि महायुतीतील अंतर्गत तणाव मतदानाच्या दिवशी पुन्हा चर्चेत आला आहे.
मुक्ताईनगर केंद्रावरही वाद
जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमनेसामने आले. मतदान केंद्रावर खडसे यांच्या प्रोटोकॉलवर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला. प्रोटोकॉलच्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. खडसे यांचे तीन ठिकाणी मतदान असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर प्रोटोकॉल शासनाकडून सुरक्षेसाठी मिळालेला असून तो आपल्यासोबतच असतो, त्यात गैर काय, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
चाळीसगावमध्ये पाटील बंडखोर उमेदवाराच्या बूथवर थांबून असल्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागेवरून नाराजी होती हे मान्य करत त्यांनी बंडखोरी झाल्याचे सांगितले. मात्र आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे. याचा अर्थ आम्ही महायुतीच्या बाहेरच्या माणसाला मतदान करू असा होत नाही, असे पाटील म्हणाले. महायुतीत कुरबुर असली तरी इतर उमेदवाराला मतदान होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा