सोमवारी, ३० नोव्हेंबर रोजी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर करणार आहे. या विधेयकावर संसदेत पुन्हा एकदा चर्चा होणार असून ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. मात्र हे विधेयक सामान्यांच्या हिताचे नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या विधेयकामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर अन्याय होईल, असे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता मोठे पाऊल उचलले असून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
पवार गट आणि डीएमके पाठिंबा देण्याची शक्यता
विरोधी बाकावर असलेले शरद पवार गट आणि डीएमके हे दोन्ही पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले तर हे विधेयक पारित होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आता प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीत संबंधित विधेयक सामान्यांच्या हिताचे कसे नाही, याबाबत सांगितले जाणार आहे. तसेच या दोन्ही पक्षप्रमुखांचे मन वळवण्याचा यात प्रयत्न होणार आहे.
आज चेन्नई आणि मुंबईत भेटी
मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर असतील. ते चेन्नईत डीएमके पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतील. या दोन्ही नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता चेन्नईत होईल. त्यानंतर खरगे रात्री मुंबईत येऊन शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, आता खरगे यांना या प्रयत्नात यश येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे संसदेत आसनांची व्यवस्था बदलण्यात येत आहे. पाठिंबा देण्याची शक्यता असणाऱ्या सुमारे ९७ खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यामुळे विधेयक पटलावर ठेवल्यानंतर नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा