भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध पटेल आर मार्टमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुराच्या पाकिटांमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ग्राहकांची एफडीएकडे तक्रार
ग्राहकांनी तातडीने या प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली आहे. त्यांनी एफडीएला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकान मालकांवर आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी एफडीएकडून लवकरच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खरेदी करताना जागरूक राहण्याचे आवाहन
ग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागरूक राहावे आणि अशा प्रकारच्या घटना आढळल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी भूमिका ग्राहकांनी मांडली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा