, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गुडघे गावात योगेश कदम यांचा आपुलकीचा मुक्काम

दापोलीचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुडघे गावात आपुलकीचा मुक्काम केला. मातीच्या घरात केळीच्या पानावर जेवण घेत त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

गुडघे गावात योगेश कदम यांचा आपुलकीचा मुक्काम

कोकणातलं कौलारू मातीचं घर, शेणाने सारवलेली जमीन, माजघर, ओटी, पडवी आणि घरासमोरील अंगणात सुपारीचा मांडव — अशा खास कोकणी थाटाच्या जुन्या घरात दापोली मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुडघे गावात आपुलकीचा मुक्काम केला. शनिवारी रात्री सगळ्यांबरोबर माजघरातील सारवलेल्या जमिनीवर बसून ज्येष्ठ शेतकरी बागायतदार मिलिंद दांडेकर यांच्या घरात चुलीवर केलेल्या आमटी-भाताचं केळीच्या पानावरील रुचकर जेवण मंत्र्यांनी घेतलं. योगेश कदम यांच्या अत्यंत साध्या आणि आपुलकीच्या वागण्याने त्यांच्यातील साधा कोकणी माणूस ग्रामस्थांना जवळून पाहता आला.

वारकरी दिंडीने स्वागत

कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या दापोली तालुक्यातील गुडघे गावाची निवड नोव्हेंबर महिन्यातील ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. महिन्यातून एक दिवस एका गावात वास्तव्य करून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता यावं आणि थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा मुंबईहून गावात आगमन झाल्यानंतर डोक्यावर टोपी आणि अबीर-गुलाल लावत टाळ-मृदुंगाच्या गजरात ग्रामस्थांनी वारकरी दिंडीने त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. यावेळी योगेश कदम यांनीही वारकऱ्यांसमवेत डोक्यावर वारकरी टोपी घालून टाळ घेत पंढरीच्या विठुरायाच्या गजरात ठेका धरला. दांडेकर कुटुंबीयांनीही प्रथमच थेट राज्यमंत्री घरी वास्तव्याला आल्याने साध्या पण पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केलं.

गावाचा ऐतिहासिक वारसा

दांडेकर कुटुंबीयांशी संवाद साधत आजोबांनी बांधलेल्या तब्बल ८० वर्षांपूर्वीच्या या जुन्या घराची माहिती योगेश कदम यांनी आपुलकीने घेतली. घराच्या समोरच्या अंगणात ग्रामस्थांबरोबर खळा बैठकीत गावाची भौगोलिक माहिती घेत त्यांनी इतिहास जाणून घेतला. आपल्या मतदारसंघातील गावाचं वैशिष्ट्य, इतिहास, तेथील नागरिकांचं जीवनमान आणि त्यांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातील अडचणी-प्रश्न थेट समजून घ्यावेत, यासाठीच या गावाला भेट देऊन थेट वास्तव्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी योगेश कदम यांनी दिली. खळा बैठकीत गावचा लिखित स्वरूपातील इतिहास असल्याची माहिती ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले यांनी दिली. चैतन्य दांडेकर यांनी गोळकोटचा ऐतिहासिक किल्ला आणि दाभोळ हे व्यापारी केंद्र असल्याचं सांगितलं. त्यावेळी या व्यापारी केंद्राची लूट होण्याचे प्रकार घडत. गोळकोट किल्लेदारांकडे असलेले कारभारी दांडेकर यांनी व्यापारी केंद्राची लूट करून नेणाऱ्या जहाजांना अडवण्यासाठी समुद्रात साखळदंडाचा वापर केला आणि तो गनिमी कावा यशस्वी झाला. त्यानंतर दांडेकरांना घोंगडीभर सूत सोडून जेवढा पसारा झाला तितकं क्षेत्र हे गाव दांडेकर कुटुंबाला इनाम मिळालं. त्याकाळचे जोते आणि विहीर आजही पाहायला मिळतात. अनंत करबेले यांनी या गावात येताना डोंगरदऱ्या चढून-उतरून यावं लागतं आणि गुडघे दुखतात, म्हणूनच या परिसराला गुडघे गाव हे नाव पडलं, अशीही माहिती दिली. गावात १९८८ पर्यंत वीज नव्हती आणि १९८९ पर्यंत रस्ताही नव्हता, असंही ग्रामस्थांनी सांगितलं. गावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न, आरोग्य आणि नळपाणी योजना या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केल्याची माहितीही योगेश कदम यांनी दिली.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance