गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात वारंवार कारवाई केली जात आहे. त्यातच आता अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तालाच दणका दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील गो-संवर्धन गोरस भंडार प्रकरणात कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून वर्धा येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल्ल टोपले यांना निलंबित करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली. ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली.
## गोरस भंडार प्रकरणात नेमकी काय झाली चूक?
गोरस भंडारशी संबंधित २०२०, २०२२ आणि २०२३ या वर्षांतील तपासणी व निरीक्षण अहवालांवर नियमानुसार आवश्यक कारवाई न केल्याचा ठपका टोपले यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या अहवालांमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संस्थेला निर्देश देणे, संबंधित संस्थेविरुद्ध आवश्यक प्रशासकीय कारवाई करणे तसेच गरज भासल्यास परवाना निलंबित करण्यासारखी पावले उचलणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित प्रकरणांमध्ये वेळेत योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले. ही बाब गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा मानण्यात आली आहे.
दरम्यान, निलंबनाच्या कालावधीत टोपले यांचे मुख्यालय सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, वर्धा येथे निश्चित करण्यात आले आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
## पुढे काय होणार?
या कारवाईनंतर गोरस भंडार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर आणखी कोणती पावले उचलली जातात आणि संबंधित प्रकरणाची पुढील दिशा काय असते, याकडे आता प्रशासनासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात वारंवार कारवाई केली जात आहे. त्यामुळे या विभागातील निष्काळजीपणाविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे या कारवाईतून दिसून येते.
प्रतिक्रिया व्यक्त करा