अचलपूरची औद्योगिक ओळख असलेल्या फिनले मिलचा भोंगा बंद होऊन सहा वर्षे उलटली, मात्र या काळात कामगारांच्या संसाराची झालेली वाताहत थांबलेली नाही. रोजगार हिरावला, नियमित उत्पन्नाचे साधन संपले आणि हक्काचे वेतनही पदरात पडले नाही. परिणामी शेकडो कुटुंबे कर्जबाजारीपणा, उपासमार आणि मुलांच्या शिक्षणापासून औषधोपचारांपर्यंतच्या विवंचनेत अडकली आहेत. मिल बंद झाल्यापासून आतापर्यंत १८ कामगारांनी आत्महत्या केल्याचा कामगारांचा दावा आहे. त्यात अवघ्या तीन दिवसांत दोन कामगारांच्या आत्महत्यांनी या संकटाची भीषणता पुन्हा अधोरेखित केली आहे. या मिलमध्ये कायम, बदली आणि अन्य कर्मचारी मिळून सुमारे ८०० कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या प्रश्नाशी जोडलेला आहे.
मिल बंद का पडली?
फिनले मिल ही राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) अखत्यारीतील केंद्र सरकारचा उपक्रम आहे. करोनाच्या संकटामुळे मार्च २०२० मध्ये देशव्यापी टाळेबंदी लागू झाल्यानंतर गिरणीतील उत्पादन थांबले. जानेवारी २०२१ मध्ये काही काळ उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली; मात्र कापसाची अनुपलब्धता, खेळत्या भांडवलाचा अभाव आणि आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा कामकाज बंद पडले. तेव्हापासून गिरणीचे चाक फिरलेले नाही. एनटीसीच्या अधिकृत माहितीनुसार फिनले मिलच्या आधुनिकीकरणावर २५७.४५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एवढी मोठी गुंतवणूक होऊनही उद्योग बंद राहणे आणि कामगारांचे संसार उद्ध्वस्त होणे, ही व्यवस्थेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
थकीत वेतन आणि कुटुंबांची वाताहत
कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही अधिकाधिक गंभीर बनला आहे. कामगारांच्या माहितीनुसार २८ महिन्यांचे ५० टक्के आणि त्यानंतरचे १२ महिन्यांचे १०० टक्के वेतन असे सुमारे ४० महिन्यांचे वेतन थकीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिवाळी बोनसही मिळालेला नाही. काही काळ मिळणारे अर्धे वेतनही आता नियमित नसल्याने घरखर्चासाठी कर्ज काढणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढून वापरणे आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणे, एवढेच पर्याय कामगारांसमोर उरले आहेत. मिल बंद झाल्यानंतर अनेकांनी ऑटोचालक, हमाली, बांधकाम मजुरी अशी कामे स्वीकारली; मात्र या तुटपुंज्या उत्पन्नातून कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे.
गिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी कामगार संघटनांनी निवेदने, आंदोलने आणि चिमणीवर चढूनही शासनदरबारी दाद मागितली. शिष्टमंडळांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेत सौर-पवन ऊर्जा प्रकल्प, खेळते भांडवल तसेच व्यवस्थापनातील सुधारणांचे पर्याय पुढे केले. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस कृती करण्याऐवजी केवळ आश्वासनांचीच खैरात केली. निवडणुकीच्या काळात फिनले मिलचा प्रश्न राजकीय व्यासपीठांवर गाजतो. नेत्यांच्या भेटी होतात, बैठका होतात, निधीची आश्वासने दिली जातात; मात्र कामगारांच्या हाताला काम आणि हक्काचे वेतन मिळत नाही. फिनले मिल सुरू करण्याचा प्रश्न आता केवळ आर्थिक हिशेबापुरता राहिलेला नसून तो थेट कामगारांच्या जगण्या-मरण्याशी जोडला गेला आहे. धोरणात्मक उदासीनता आणि रखडलेली थकीत देणी यामुळे कामगारांचा संयम तुटत चालला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर शासन-प्रशासन जागे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा