पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत शनिवारी अविश्वास ठरावावरून जोरदार गोंधळ उडाला. एका गटाने ठराव मंजूर झाल्याचा दावा करत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली, तर अध्यक्षांनी संपूर्ण ठरावच बेकायदा असल्याचे सांगितले. त्यामुळे परिषदेत सत्तांतराची नांदी की आणखी वाद, यावर चर्चा सुरू झाली आहे.
## सभेत नेमकं काय घडलं?
शनिवारी सकाळी अकरा वाजता माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यकारी मंडळाची सभा सुरू झाली. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली. श्रद्धांजलीसाठी सर्वांना उभे राहण्याची सूचना प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी केली. त्याच क्षणी सुनील महाजन यांनी अविश्वास ठरावावर उत्तर देण्याची मागणी केली आणि गोंधळाला सुरुवात झाली. गोंधळात आणि घटनाबाह्य पद्धतीने कामकाज चालवता येणार नाही, अशी भूमिका घेत अध्यक्ष योगेश सोमण यांनी सभा तहकूब केली.
## दोन्ही गटांचे परस्परविरोधी दावे
महाजन यांच्या गटाने 21 जणांच्या बहुमताच्या आधारे अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. परिषदेच्या आवारातच महाजन यांची अध्यक्षपदी, राजन लाखे यांची प्रमुख कार्यवाहपदी आणि उन्मेष गायधनी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी बहुमताअभावी पलायन केले असून, पीठासीन अधिकारी नेमून बैठक पूर्ण केल्याचा या गटाचा दावा आहे. या गटाच्या बैठकीचे पीठासीन अधिकारी पुरुषोत्तम काळे यांनी ‘नांदी’ संमेलने तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
दुसरीकडे, अविश्वास ठराव सभेच्या पटलावर आलाच नाही, त्यामुळे तो मंजूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अध्यक्ष सोमण यांचे म्हणणे आहे. हा ठराव बेकायदा असून, या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवले जाईल, असे त्यांनी सांगितले. आक्षेप असलेल्यांनी न्यायालयात जावे, असे आव्हानही त्यांनी दिले. दरम्यान, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर या वादाचा परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा दोन्ही गटांनी व्यक्त केली आहे. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे हेच राहतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वागताध्यक्ष करून संमेलन यशस्वी करण्याची भूमिका महाजन यांनी घेतली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा