संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून दक्षिणेतील राज्यांमध्ये वाद पेटला आहे. इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी आपली भूमिका बदलल्याने या चर्चेला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने विधेयकाला दिलेल्या पाठिंब्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश राज यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना थेट सवाल केला आहे की, हा विश्वासघात नाही का? त्यांनी द्रमुकला सहा महिन्यांपूर्वीची भूमिका आठवून दिली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच द्रमुकने या विधेयकावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. हे विधेयक अत्यंत धोकादायक असतानाही द्रमुक त्याला पाठिंबा कसा देऊ शकतो, असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. हा एक स्वार्थी निर्णय असून जनतेशी विश्वासघात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, द्रमुकने आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि विधेयकाला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी प्रकाश राज यांनी केली आहे.
द्रमुकच्या खासदारांची भूमिका काय?
दुसरीकडे या विधेयकावर द्रमुकच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार कनिमोझी यांनी माध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. द्रमुकने आपली भूमिका बदललेली नाही, पक्ष नेहमीच निष्पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेच्या मागणीवर ठाम होता आणि आहे, असे त्यांनी सांगितले. पुनर्रचना रोखण्यापेक्षा तामिळनाडूचे कोणतेही नुकसान होऊ नये, हाच पक्षाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधेयकात नेमके काय आहे?
केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. काही दाव्यांनुसार या विधेयकात अखंड भारत आणि पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख आहे. या विधेयकामुळे लोकसभेतील संख्याबळ 543 वरून 815 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. खासदार आणि आमदारांची संख्या वाढेलच, त्यासोबत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या मसुद्यावरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत. काँग्रेसने या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे, तर इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी एनडीएची बाजू घेतल्याने त्या त्या राज्यात गदारोळ सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा