, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

वाशिमजवळ समृद्धी महामार्गावर कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या सिन्हा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर २० वर्षीय मुलीसह तिघे जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

वाशिम जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. वाशिमलगतच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनवर वनोजा ते कारंजा दरम्यानच्या लोहारा जवळ कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. यातील एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती आहे.

अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सिन्हा कुटुंबातील पाच जण कारद्वारे मुंबईवरून नागपूरकडे समृद्धी महामार्गाने जात होते. वाशिमच्या वनोजा ते कारंजा दरम्यानच्या लोहारा जवळ कार चालक विकास सिन्हा यांना झोपेची डुलकी लागल्याने त्यांच्या भरधाव कारची समोर जाणाऱ्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक बसली. त्यानंतर ती कार समृद्धी महामार्गाच्या बाजूच्या स्टील गार्डला धडकून भीषण अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातात कार चालक विकास सिन्हा आणि एका वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची मोठी २० वर्षीय मुलगी अनया सिन्हा गंभीर जखमी झाली असून पत्नी आनंदा सिन्हा आणि लहान १० वर्षीय मुलगी युवा सिन्हा या दोघी जखमी झाल्या आहेत.

जखमींवर उपचार सुरू

सध्या या सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने आणि तिघे जखमी झाल्याने या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी झोपेची डुलकी टाळण्यासाठी वेळोवेळी विश्रांती घेणे किती गरजेचे आहे, हे या अपघाताने पुन्हा अधोरेखित केले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance