अमेरिकेच्या चीनविषयक धोरणात सध्या एक महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसत आहे. गेल्या दोन दशकांपासून चीनला अमेरिकेचा सामरिक प्रतिस्पर्धी मानले जात होते. चीनचा वाढता आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानविषयक प्रभाव रोखणे हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असोत किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचे, चीनच्या बाबतीत अमेरिकेच्या भूमिकेत फारसा मूलभूत बदल झाला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हे चित्र बदलताना दिसत आहे. चीनशी संघर्ष करण्याऐवजी जुळवून घेण्याची भूमिका ट्रम्प घेत आहेत. एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांचे पदावरून दूर होणे आणि अवघ्या ११ दिवसांत पुन्हा त्याच पदावर पुनरागमन होणे, या घडामोडींकडे याच दृष्टिकोनातून पाहावे लागेल.
एनव्हिडिया आणि हुआंग यांचे महत्त्व
एनव्हिडिया ही सेमीकंडक्टर क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची अमेरिकन कंपनी आहे. मायक्रोचिप आणि प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या कंपनीचे मोठे वर्चस्व आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या चिप्सच्या निर्मितीत एनव्हिडियाची भूमिका निर्णायक आहे. जेन्सेन हुआंग हे कंपनीच्या स्थापनेपासून तिच्याशी जोडलेले असून एनव्हिडियाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आणि बाजारपेठ मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
अलीकडेच त्यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर या महाकाय कंपनीची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा सुरू होती. टीम कुक यांच्यासारखी अनेक नावे त्याअनुषंगाने चर्चेत येत होती; पण अवघ्या ११ दिवसांत त्यांचे याच पदावर पुनरागमन झाले आणि जगाला आश्चर्याचा धक्का बसला.
पदावरून दूर करण्यामागची कारणे
हुआंग यांना पदावरून दूर करण्यामागे विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा चर्चेत होता. मात्र त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे चीनसाठी हेरगिरी केल्याचा त्यांच्यावर व्यक्त झालेला संशय. अमेरिकेत चीनविषयी असलेली भावना लक्षात घेतली, तर हा आरोप अत्यंत संवेदनशील होता. चीन हा अमेरिकेचा आर्थिक प्रतिस्पर्धी तर आहेच; पण भविष्यातील सामरिक आव्हानही मानला जातो. अशा राष्ट्रासाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला एनव्हिडियासारख्या महत्त्वाच्या कंपनीच्या नेतृत्वात ठेवण्याबाबत अमेरिकेत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते.
या प्रकरणात मेगास्पीड या सिंगापूरस्थित कंपनीच्या प्रमुख आणि चिनी नागरिक असलेल्या अॅलिस हुआंग या चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांच्या कंपनीमार्फत प्रगत एआय चिप्स बेकायदेशीरपणे चीनला पाठवल्या गेल्याचाही संशय आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर हुआंग यांचे अवघ्या ११ दिवसांत पुनरागमन होणे ही केवळ कंपनीअंतर्गत घडामोड नसून अमेरिकेच्या बदलत्या चीन धोरणाशी जोडून पाहिली जाणारी घटना आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा