सोलापूर जिल्हा हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ताकद दाखवली होती आणि त्यातून मोहिते कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध झाले होते. महायुतीची सत्ता आल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्रीपद थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आले. त्यानंतर गोरे यांनी एक-एक बालेकिल्ला जिंकण्यास सुरुवात केली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकानंतर आता जिल्हा बँकेवरही भाजपचा झेंडा फडकवला आहे. एकदम मुरब्बी राजकारण्यांचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये जयकुमार गोरे यांनी भाजपला हे यश कसे मिळवून दिले, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
साताऱ्यातील अनुभवातून सोलापूरची रणनीती
सातारा आणि सोलापूर जिल्हा बँका ताब्यात घेण्यासाठी भाजपने रणनीती आखली होती. दोन्ही बँका ताब्यात घेण्याची महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टाकली होती. दोन्ही ठिकाणी काही जागा बिनविरोध झाल्या, तर काही जागांवर निवडणुका झाल्या. सातारा जिल्हा बँकेत भाजपचे सर्वाधिक संचालक असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत बँक ताब्यात घेतली होती. त्यावरून जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती धर्म पाळला नाही, अशी टीका केली होती. दम होता तर निवडणूक स्वतंत्र लढायची होती आणि बदल्याची व जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांनी समोरासमोर लढाई करायची होती, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
सातारा जिल्हा बँकेत जे घडले ते त्यांनी सोलापूर जिल्हा बँकेत होऊ दिले नाही. स्थानिक नेत्यांशी समन्वय साधत आणि काही तडजोडी करत त्यांनी 10 जागा बिनविरोध केल्या. त्यावरून जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झाले होते. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात आठ जागा भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलने जिंकल्या. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपाने मोहिते-पाटील यांच्या पॅनेलला फक्त माळशिरस सोसायटी मतदारसंघाची एक जागा जिंकता आली.
दहा जागा बिनविरोध, आठ जागांवर विजय
शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील लोकांना सोबत घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेसाठी डाव टाकला. शिवाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, मंगळवेढ्याचे सिद्धेश्वर आवताडे, माढ्याचे यशराज शिंदे आणि सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांसारख्या नेत्यांना त्यांनी एकत्र केले. तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची दोन्ही मुले बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांना संचालक करण्यात आले. सोलापूरमध्ये जयकुमार गोरे यांनी स्थानिक नेत्यांची मोट बांधली आणि प्रसंगी तडजोडी करत उमेदवारी देत त्यांना निवडूनही आणले.
मोहिते कुटुंबातील केवळ जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील हेच रिंगणात होते. तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. भाजपसोबत जिल्ह्यातील मातब्बर मंडळी असल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाली होती. मोहिते कुटुंबाची म्हणावी तशी ताकद यावेळी दिसून आली नाही. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षांनंतर बँक भाजपच्या ताब्यात गेली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा