, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रामेश्वर खामकर यांचा राजीनामा; विचारांशी तडजोड नाही

परिसीमन विधेयकाला पाठिंब्याच्या संकेतांमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजी वाढली. सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

रामेश्वर खामकर यांचा राजीनामा; विचारांशी तडजोड नाही

देशातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या विधेयकाला पक्षाकडून पाठिंबा देण्याचे संकेत मिळत असल्याने पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. याच नाराजीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पहिला राजीनामा पडला आहे.

खामकर यांचा राजीनामा

परिसीमन विधेयकाला पवारांच्या पक्षाने पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाच्या भूमिकेशी असहमती व्यक्त केली आहे. परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी विसंगत असल्याचे खामकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पक्षातील वैचारिक भूमिका जपणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा पत्रात खामकर यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या सोशल मीडिया सेलमध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करताना पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला. मात्र आज पक्षाने परिसीमन विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा पाईक असलेल्या कार्यकर्त्याच्या मनाला अजिबात पटणारा नाही, असे त्यांनी नमूद केले. पक्षाच्या निर्णयांशी मतभेद असू शकतात; परंतु विचारधारेशी तडजोड कशी करायची, असा सवालही त्यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

पदापेक्षा विचार मोठे

आज प्रश्न केवळ एका विधेयकाला पाठिंबा देण्याचा नाही, तर पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा आहे, असे खामकर यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर कोणती भूमिका मांडायची, असा सवाल त्यांनी केला आहे. कालपर्यंत ज्या विचारसरणीविरोधात आपण लढत होतो, त्याच विचारसरणीला आज पाठिंबा देण्यामागची वैचारिक भूमिका काय आहे, असेही त्यांनी विचारले आहे. सोयीनुसार वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची मूळ विचारधारा आणि पुरोगामी प्रतिमा कलंकित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

माझ्यासाठी पदापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत, सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि राजकीय निष्ठेपेक्षा संविधाननिष्ठा महत्त्वाची आहे, अशी भूमिका खामकर यांनी पत्रात मांडली आहे. त्यामुळे आपल्या पुरोगामी विचारांशी कोणतीही तडजोड करणे आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याच वैचारिक भूमिकेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

वरील पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरदेखील शेअर करण्यात आले आहे. पत्रात खामकर यांनी पुढे म्हटले आहे की, आपण राजकारणात पदासाठी आलो नाही, तर विचारांसाठी आलो आहे. पुरोगामी विचारांचा पाईक म्हणून संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी ही आपल्या सार्वजनिक जीवनाचा मूलाधार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पक्षाचे दोन तुकडे झाले तरी मुळ राष्ट्रवादीसोबत राहून सोशल मीडिया सेलचा बीड जिल्हा अध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारीही पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न आपण केला, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

माझ्यासाठी पद सोडणे अवघड नाही; पण स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून पदावर राहणे अशक्य आहे, असे खामकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. यापुढेही आपली बांधिलकी कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशी मर्यादित नसेल. ती संविधानाशी, लोकशाहीशी, पुरोगामी विचारांशी आणि सर्वसामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांशी असेल, असे त्यांनी म्हटले आहे. आपला संघर्ष सत्तेसाठी नाही, विचारांसाठी आहे, असे सांगत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance