देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डिलिमिटेशनबाबत आपले वैयक्तिक मत मांडले आहे. डिलिमिटेशन होणे गरजेचे आहे, मात्र सरकारने हे विधेयक आणण्याची पद्धत चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लोकसंख्या वाढत असल्याने लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे. बराच काळ उलटला असून डिलिमिटेशन होणे आवश्यक आहे. मात्र, हा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या संमतीने झाला असता, तर अधिक चांगले झाले असते. जनगणनेनंतरच डिलिमिटेशन व्हावे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या पद्धतीवर आक्षेप
डिलिमिटेशन व्हायला हवे, पण सरकारने ज्या पद्धतीने हे विधेयक आणले आहे, त्याच्याशी आपण सहमत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत विचारले असता, तो वेगळा पक्ष असल्याने त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, द्रविड प्रांताच्या विभाजनाबाबत विचारले असता शिंदे यांनी भाजपच्या मनात नेमके काय आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. मात्र, अशा प्रकारचे विभाजन झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांना धोका पोहोचू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संविधानाच्या मूळ विचारांचा मुद्दा
संविधानाच्या मूळ विचारांच्या विरोधात कामकाज होत असेल, तर ते देशासाठी धोकादायक असल्याचेही शिंदे म्हणाले. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चा सुरू असताना शिंदे यांनी मांडलेली ही भूमिका लक्षवेधी ठरली आहे. जनगणना आधी आणि त्यानंतर सर्वांच्या संमतीने पुनर्रचना व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा