नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मक परिवर्तनाची नांदी झाली आहे, असे मानले जात आहे. त्यांचे पूर्वसुरी के. पी. शर्मा ओली यांच्या चीनधार्जिण्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी नवी दिल्लीला दिलेले प्राधान्य हे नेपाळच्या कूटनीतिक प्राधान्यक्रमात होत असलेल्या मोठ्या बदलाचे द्योतक मानले जात आहे.
ओलींच्या बीजिंग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बदलाचे संकेत
गेल्या काही काळापासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती आणि मतभेदांचे मळभ दाटले होते. बालेन शाह यांचा हा दौरा ते मळभ दूर करून परस्पर सहकार्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. दक्षिण आशियात चीनचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव वाढत असताना नेपाळच्या नेतृत्वासमोर आपला खरा आणि पहिला शेजारी कोण, हा प्रश्न पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. बालेन शाह यांचे पूर्वसुरी के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या चौथ्या कार्यकाळातील परदेश दौऱ्याची सुरुवात बीजिंगमधून केली होती. शेजारील बांगला देशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनीही आपल्या परदेश दौऱ्यांचा प्रारंभ मलेशिया आणि चीनमधून केला होता. या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी भारताला दिलेले प्राधान्य हे नेपाळच्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रमात होत असलेल्या बदलाचे लक्षण म्हणून पहावे लागेल.
तरुणांच्या आंदोलनातून सत्तेवर आलेले सर्वांत तरुण पंतप्रधान
सप्टेंबर २०२५ मध्ये तरुणांच्या जनआंदोलनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मोठा जनादेश मिळाला आणि बालेन शाह नेपाळचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. त्यांची आक्रमक राष्ट्रवादी प्रतिमा, काठमांडूचे महापौर असताना भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि लिपुलेखाच्या मुद्द्यावर भारत-चीन यांच्यात झालेल्या कराराबद्दल नेपाळमध्ये असलेला असंतोष या बाबी लक्षात घेता, हा दौरा त्यांच्यासाठी देशांतर्गत टीकाकारांसमोर संतुलन साधण्याची एक कसरतही होती. मात्र, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेन शाह यांच्या भेटीत संबंधांमधील राजकीय परिपक्वता स्पष्टपणे दिसून आली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, दळणवळण, सीमा व्यवस्थापन, पुरानंतरचे पुनर्वसन आणि प्रादेशिक-जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. दोन्ही देशांनी ‘विकसित भारत आणि समृद्ध नेपाळ’ या नावाने संयुक्त दृष्टिकोन पत्रही प्रसिद्ध केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा