कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) उपयोग अनिर्बंधपणे वाढत गेला तर २०२७ मध्ये, अर्थात पुढील एकाच वर्षात कोरोना काळापेक्षाही अधिक मृत्यू होतील, असा इशारा प्रसिद्ध संशोधक निकोला युर्कोविच यांनी दिला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच हे तंत्रज्ञान माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि त्याचा परिणाम जगभरातील सर्वसामान्य लोकांना भोगावा लागेल, असे भाकित त्यांनी केले आहे.
सर्वात मोठा धोका कोणता?
सर्वात प्रमुख धोका हे तंत्रज्ञान गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा आहे. तसे झाल्यास दहशतवादी आणि समाजघातकी शक्ती या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जैविक शस्त्रे बनवू शकतील आणि त्यांची धमकी देऊन संपूर्ण मानवजातीला वेढीला धरले जाण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल व्हायरस बनवले जातील आणि जगाची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. सायबर दहशतवाद्यांच्या हाती हे तंत्रज्ञान पडल्यास ते ऑनलाईन बँकिंग ठप्प करू शकतात, ज्यामुळे जगात हाहाकार माजू शकतो, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
कोरोनाशी तुलना
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी झालेल्या कोरोनाच्या जागतिक उद्रेकात जगभरात ७१ लाखांहून अधिक मृत्यू झाले होते. तथापि, अनेक संशोधक आणि वैज्ञानिकांच्या मते कोरोनात मृत्यू पावलेल्यांची संख्या २ कोटींहून अधिक होती. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान ज्या वेगाने मानवाच्या हाताबाहेर जात आहे, त्याचा विचार करता २०२७ या एकाच वर्षात कोरोना काळात झालेल्या मृत्यूपेक्षा अधिक मृत्यू जगात होण्याची शक्यता आहे. यासंबंधी त्वरित संपूर्ण जगाने एकत्र येऊन उपाय शोधण्याची आवश्यकता आहे, अशी महत्त्वाची सूचना युर्कोविच यांनी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा