फोल्डेबल स्मार्टफोनप्रेमींसाठी मोटोरोला मोठी भेट घेऊन येत आहे. कंपनीचा आगामी क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 2027 नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल चार महिने आधीच, म्हणजे जानेवारी २०२७ मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या CES 2027 अर्थात लेनोवो टेक वर्ल्ड इव्हेंटमध्ये या फोनवरून पडदा हटवला जाऊ शकतो. कंपनीमध्ये या स्मार्टफोनला अंतर्गतरीत्या रॅप्टर या कोडनेमने ओळखले जात असून, त्याचे अधिकृत रेंडर्स आणि संपूर्ण तांत्रिक वैशिष्ट्ये नुकतीच लीक झाली आहेत. मात्र, कंपनीने अद्याप या फोनची अधिकृत घोषणा केलेली नाही.
मोठा कव्हर डिस्प्ले आणि पातळ डिझाइन
Motorola Razr 2027 च्या डिझाइनमध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या बाहेरील स्क्रीनमध्ये पाहायला मिळणार आहे. मागील मॉडेलमधील ३.६ इंचाच्या स्क्रीनऐवजी यात आता तब्बल ४ इंचाचा मोठा OLED कव्हर डिस्प्ले दिला जाईल, जो १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्यामुळे फोन न उघडताच मेसेज, नेव्हिगेशन आणि इतर अॅप्स वापरणे अधिक सोपे होणार आहे. फोनच्या आतील बाजूला ६.९ इंचाचा मुख्य फोल्डेबल OLED डिस्प्ले असेल, ज्यामध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट मिळेल. फोन बंद असताना त्याची जाडी केवळ १४.६ मिमी इतकी पातळ असेल, मात्र मोठ्या बॅटरीमुळे त्याचे वजन थोडे वाढून १९५ ग्रॅम झाले आहे. हा स्मार्टफोन पँटोनच्या तीन आकर्षक रंगांमध्ये — पेल सेज, डार्क ग्रीन व ब्रॉन्झ ब्रश्ड शेड्समध्ये उपलब्ध होईल.
प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा
परफॉर्मन्सचा विचार करता, या फोल्डेबल फोनमध्ये मीडियाटेकचा नवीन डायमेन्सिटी ७५५०X हा ऑक्टा-कोअर चिपसेट दिला जाणार आहे. यासोबत ८ GB LPDDR5 रॅम आणि २५६ GB इंटरनल स्टोरेजचा पर्याय मिळेल. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १७ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालेल आणि कंपनीकडून याला तीन वर्षांपर्यंत ओएस अपडेट्स दिले जातील. फोल्डेबल फोनमधील बॅटरीची तक्रार दूर करण्यासाठी मोटोरोलाने यात तब्बल ५०००mAh क्षमतेची ड्युअल-सेल बॅटरी दिली आहे. याला ४५W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि १५W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. पाण्यापासून आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोनला IPX8, IPX9 आणि IP4X रेटिंग देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या बाहेरील कव्हर स्क्रीनवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर समाविष्ट आहे. तसेच, आतील फोल्डेबल स्क्रीनवर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. जागतिक बाजारातही हा फोन याच नावाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा