विरोधकांच्या इंडिया आघाडीला चकवा देत शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्ताधारी एनडीएच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून ज्या डिलिमिटेशन बिलाला प्रचंड विरोध केला जात आहे, त्या बिलाला पाठिंबा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं जात असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदेचे विशेष अधिवेशन सोमवार, ३० नोव्हेंबरपासून सुरू होत असून लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्या अनुषंगाने महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित घटनादुरुस्ती हे या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहणार आहे.
## तीन वर्षांपूर्वीचा अंदाज खरा ठरला?
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, २ जुलै २०२३ ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती, त्यावेळेस त्यांनी हा अंदाज व्यक्त केला होता. पुढे तीन वर्षं दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी भांडणाचं नाटक केलं आणि आता सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीमही निघाली आहे, असं राज यांनी म्हटलं आहे. हे पवारांचं जंतरमंतर असून ते फार थोड्या लोकांना कळतं, अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या भूमिका बदलावर टीका केली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा दुसरा गटही लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा अंदाज राज ठाकरेंनी तेव्हा व्यक्त केला होता.
## २०२३ मधील ती पोस्ट काय होती?
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी दुसरा गटही लवकरच भाजपसोबत जाईल, असं भाकीत केलं होतं. महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला, असं म्हणत त्यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं आणि त्याचा पहिला अंक पार पडला आहे. पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली असून यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल, असं राज यांनी तेव्हा म्हटलं होतं. महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं महत्त्व रुचत नव्हतं आणि त्यावर अनायसे उतारा शोधला गेला, असंही त्यांनी नमूद केलं होतं. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे, हे पाहून जीव तुटतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक असल्यामुळे सत्तेच्या सिंहासनासाठीचे हे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये जनता हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार, असा प्रश्नही त्यांनी तेव्हा उपस्थित केला होता.
या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा