जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आणखी एक मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. पृथ्वीवरील वाढती वीजटंचाई, डेटा सेंटर्सचा प्रचंड खर्च आणि एआय तंत्रज्ञानाची वाढती मागणी लक्षात घेऊन मस्क यांना एआय डेटा सेंटर्स थेट अवकाशात उभारायची आहेत.
विशेष म्हणजे, अवकाशात जवळपास सतत उपलब्ध असणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून या डेटा सेंटर्सना ऊर्जा पुरवण्याची त्यांची योजना आहे. मस्क यांच्या मते, अवकाशातील सूर्यप्रकाशाचा वापर केल्यास पृथ्वीवरील वीजपुरवठ्यावरचा ताण कमी होऊ शकतो. मात्र, ही कल्पना प्रत्यक्षात आणणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या कितपत शक्य आहे, यावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दहा लाख उपग्रहांचे जाळे
मस्क यांची कंपनी स्पेसएक्स या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उपग्रहांचे जाळे उभारण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाला ‘स्टारमाइंड’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (एफसीसी) स्पेसएक्सला अवकाशात तब्बल १० लाख उपग्रह तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या उपग्रहांवर एआय डेटा प्रोसेसिंगची क्षमता विकसित करण्याचा उद्देश आहे.
या यंत्रणेद्वारे अवकाशातच मोठ्या प्रमाणावर संगणकीय प्रक्रिया करून त्याचा उपयोग पृथ्वीवरील एआय सेवांसाठी करता येणार आहे. मात्र, प्रत्यक्ष उपग्रहांची उभारणी आणि तैनात करण्यासाठी प्रचंड खर्च येणार आहे. याशिवाय उपग्रहांची दुरुस्ती, देखभाल, अंतराळातील किरणोत्सर्ग आणि पृथ्वीशी वेगवान डेटा जोडणी राखणे हीदेखील मोठी आव्हाने आहेत.
तज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत वैज्ञानिक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लाखो उपग्रह अवकाशात पाठवल्यास त्यांच्यात टक्कर होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अंतराळातील कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय रॉकेट प्रक्षेपण आणि उपग्रह पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या प्रदूषणाबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
स्पेसएक्सला पहिला उपग्रह २०३३ पर्यंत तैनात करण्याची अट आहे. २०३८ पर्यंत अर्धे जाळे आणि २०४० पर्यंत उर्वरित उपग्रह तैनात करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मस्क यांची ही कल्पना प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण तंत्रज्ञान जगाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा