भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एसीसी अंडर-१९ महिला आशिया कप २०२७ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. महिला निवड समितीने यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. विकेटकीपर-फलंदाज भाविका अहिरे हिची संघाची कर्णधार म्हणून, तर अनादी तागडे हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
१८ वर्षीय भाविकाच्या हाती संघाची कमान
१८ वर्षीय भाविका अहिरेला कर्णधार, तर अनादी तागडेला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. भाविकाच्या नेतृत्वाखालील संघात इरा जाधव, निधी महतो, उमा काशवी, पूर्वा सिवाच, मेहक नरवासे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसार आणि दिया यादव या खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, अक्षया परमार आणि पलक सिंग यांनाही संधी मिळाली आहे.
संघातील अनेक खेळाडू सध्या इंग्लंडच्या १९ वर्षांखालील महिला संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहेत. भारतीय संघाने या मालिकेत शानदार कामगिरी करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.
गतविजेता म्हणून मैदानात
भारतीय संघ गतविजेता म्हणून १९ वर्षांखालील महिला आशिया कप २०२७ मध्ये सहभागी होईल. २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील महिला आशिया कपच्या पहिल्याच हंगामात, निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात बांग्लादेशला पराभूत करून संघाने विजेतेपद पटकावलं होतं. आता, भाविका अहिरेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपलं विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल.
पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२७ च्या तयारीसाठीही ही स्पर्धा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. याव्यतिरिक्त, भारताने २०२३ मध्ये आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक जिंकला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा