अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळते. नदीच्या काठावर शेकडो रंगीबेरंगी पोपट एकत्र जमतात आणि तेथील माती खाताना दिसतात. साधारणपणे पोपट फळे, बिया, फुले आणि छोटे किटक खातात, हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र माती खाणारे पोपट पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. या विचित्र वाटणाऱ्या वर्तनामागे नेमके काय कारण आहे, हे जाणून घेऊया.
माती खाण्यामागचे कारण काय?
पक्षी किंवा इतर सजीव माती खातात, या वर्तनाला जियोफॅगी असे म्हटले जाते. भूक लागली म्हणून पोपट माती खात नाहीत. त्यांच्या शरीरात आवश्यक असलेल्या खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि काही विषारी नैसर्गिक घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी ते माती खातात. ही प्रवृत्ती केवळ पोपटांपुरती मर्यादित नाही. जगभरातील अनेक सजीव नैसर्गिकरीत्या माती खातात. अॅमेझॉनचे पोपट विशेषतः नदीकाठची माती खाण्यासाठी तेथे पोहोचतात. अशा जागांना क्ले लिक्स असे म्हणतात.
आहाराचा समतोल राखण्याची पद्धत
पोपटांसाठी माती खाणे हा त्यांच्या नेहमीच्या अन्नाचा पर्याय नाही. जंगलात त्यांना फळे, बिया, पाने आणि फुलांपासून अन्न मिळते. या अन्नात अनेक पोषक घटक असतात, तरीही त्यांना पुरेशा प्रमाणात खनिजे मिळत नाहीत. अशा वेळी माती त्यांच्या शरीरातील खनिजांची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे माती खाणे ही त्यांच्या आहाराला संतुलित करण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे, असे सांगितले जाते.
प्रतिक्रिया व्यक्त करा