देशात सध्या डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने सोमवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात या विधेयकावर काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडीला हे विधेयक मंजूर करण्यासाठी आणखी खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षाने तसा पाठिंबा दिला असल्याचं आता जवळपास स्पष्ट होत आहे. दुसरीकडे स्टॅलिन यांच्या डीएमकेनेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.
## सुशीलकुमार शिंदे : लोकसंख्या वाढली, तर प्रतिनिधीही वाढायला हवेत
या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे काँग्रेस नेते आणि शरद पवारांचे एकेकाळचे सहकारी, तसंच सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका समोर आली आहे. मात्र, यावेळी बाप-लेकींच्या भूमिकांमध्ये फरक दिसून आला आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेत मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
डिलिमिटेशन विधेयकाला प्रणिती शिंदे यांचा विरोध असताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र या विधेयकाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. लोकसंख्या वाढली असेल, तर लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. काँग्रेसने या विधेयकाला अद्याप विरोध दर्शवला असला, तरी आपलं वैयक्तिक मत वेगळं असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. डिलिमिटेशन होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
## प्रणिती शिंदे : हा देश, संविधान आणि लोकशाहीचा प्रश्न
याचवेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी शरद पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसह इतर मुद्द्यांवर काँग्रेसची साथ घेतली होती. मात्र, आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विधेयकाच्या बाजूने मतदान करत असेल, तर ती काँग्रेसशी गद्दारी नाही, तर देशाशी गद्दारी आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जाऊन डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याची एवढी काय मजबुरी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत राहण्याचा विषय नसून देश, संविधान आणि लोकशाहीशी संबंधित विषय असल्याचं त्या म्हणाल्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा