, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

2024 निवडणूक बेकायदेशीर; राहुल गांधींचा डिलिमिटेशनवर हल्ला

डिलिमिटेशनवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 2024 ची निवडणूक बेकायदेशीर होती आणि वाराणसीतही पराभव झाला असता, असा दावा त्यांनी केला.

2024 निवडणूक बेकायदेशीर; राहुल गांधींचा डिलिमिटेशनवर हल्ला

केंद्र सरकारने डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. या विधेयकाला शरद पवार गटाने आणि डीएमकेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. मात्र, इंडिया आघाडीने आज एकमुखाने या विधेयकाला विरोध करण्याचं सांगितलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचं सांगतानाच 2024 मध्ये झालेली लोकसभा निवडणूक बेकायदेशीर होती, असा खळबळजनक दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

## 850 जागा का वाढवायच्या, राहुल गांधींचा सवाल

महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे. मग 850 जागा का वाढवायच्या आहेत? हा बदल करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पाहिजे त्या मतदारसंघावर पाहिजे तशा रेघोट्या मारण्यासाठी आणि आपल्या सोयीचे मतदारसंघ बनवण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 850 जागा वाढवणं हा लोकशाहीचा खून असल्याचं ते म्हणाले. भारताच्या मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डिलिमिटेशन ही नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांची कल्पना असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांना तरुण पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे, असं ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांपासून मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितलं की, आता डिलिमिटेशनच्या माध्यमातून सत्ता राखण्याचा नवा मार्ग शोधला जात आहे. निवडणुका चोरल्या जात असल्याचं 80 टक्के भारताला माहीत असल्याचा दावा त्यांनी केला. 2024 ची निवडणूक बेकायदेशीर होती. गॅरंटीने सांगतो, ते वाराणसीतही हरले असते, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

## दलितांच्या जागा 40 वर्षे गोठवणार असल्याचा आरोप

या डिलिमिटेशनमध्ये दलितांच्या हिताची गोष्ट नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दलितांसाठी जुनंच आरक्षण असल्याचं सांगत त्यांनी म्हटलं की, त्यांच्या जागा 40 वर्षांसाठी गोठवल्या जाणार आहेत. म्हणजे आज जेवढ्या जागा आहेत, तेवढ्याच जागा यापुढेही राहणार आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या वाढली, तरी जागा वाढवल्या जाणार नाहीत. हा दलितांवर अन्याय असल्याचा दावाही त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांची कुंडली आम्ही मांडणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. ज्ञानेश कुमार यांनी कशी चोरी केली? निवडणुका जिंकवण्यासाठी कशी मदत केली? याची सर्व माहिती आम्ही देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. थोडे दिवस थांबा, सर्व माहिती आम्ही देणार आहोत, असंही ते म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance