डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या खासदाराला थेट आव्हान दिले आहे.
शिरूरमध्ये शिवसेनेशिवाय विजय नाही, राऊतांचा दावा
या विधेयकाला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिरूरसह बहुसंख्य मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव असल्याचे सांगत ते म्हणाले की, शिवसेनेशिवाय तिथे जिंकता येणार नाही. आम्ही त्या जागा लढवू आणि कसे जिंकता हे पाहू, असे आव्हान त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिले. माढ्यातही पक्षाची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्ष फोडला गेला तरी आम्ही शरणागती पत्करली नाही, असेही राऊत म्हणाले.
देशमुख-मलिकांची माफी मागा, राऊतांचा घणाघात
भाजपला मदत करायची असेल तर आधी अनिल देशमुख यांची माफी मागावी, असे राऊत म्हणाले. भाजप आणि अमित शहा यांच्यामुळे ते तुरुंगात गेले, असा आरोप त्यांनी केला. नवाब मलिक यांचीही माफी मागावी, असेही ते म्हणाले. हे दोन्ही नेते अमित शहा आणि मोदी यांच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले, असे राऊत यांनी म्हटले आहे. पवारांच्या राष्ट्रवादीने एकतर्फी निर्णय घेत सरकारच्या बाजूने उभे राहिल्यास राज्यातील जनता ते सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आठ खासदार महाविकास आघाडी म्हणून निवडून आले, भाजपमुळे आले नाहीत, असेही राऊत म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा